सैनिकाला ध्वजारोहणास मज्जाव! सरपंच, उपसरपंचावर गुन्हे दाखल; स्वातंत्र्यदिनी घडला होता प्रकार
By सदानंद सिरसाट | Published: September 3, 2023 06:02 PM2023-09-03T18:02:10+5:302023-09-03T18:02:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गावातील लष्करी जवान, माजी सैनिक, वीर पत्नी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन केले होते.
मलकापूर (बुलढाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गावातील लष्करी जवान, माजी सैनिक, वीर पत्नी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन केले होते. मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाने जवान तसेच त्याच्या आईला त्यापासून मज्जाव केल्याने दाखल तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सैनिकाची आई मुक्ताबाई वसंता इखारे (५५) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये मुलगा तुषार वसंत इखारे हा सशस्त्र सीमा बल ८ बटालियन खपरील पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहे. १३ ऑगस्ट २०२३ रोजी तो रजेवर आला.
तेव्हापासून तो गावातच आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व म.पू.माध्यमिक शाळा शिराढोण येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश, या कार्यक्रमांतर्गत देश पातळीवर माजी सैनिक व भारतीय सैनिक तसेच वीर पत्नीच्या हस्ते मान सन्मानाचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मुलाला कार्यक्रमापासून वंचित ठेवले. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता तुम्हाला मान देणार नाही, असे म्हटले. तसेच अपमानित करून हाकलून दिले होते. याबाबत ॲड. प्रफुल्ल तायडे यांच्यासह नागरिकांनी १८ ऑगस्ट रोजी तहसीलदार यांनाही निवेदन दिले.
त्यानंतर याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी शिराढोण ग्रामपंचायत सरपंच उज्वला मनीष पाटील, उपसरपंच पद्मिनी रघुनाथ नारखेडे, शारदा प्रदीप वराडे, बादल रवींद्र पाटील, ग्रामसेवक रमेश राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश प्रल्हाद पाटील, शिक्षण समिती अध्यक्ष प्रशांत प्रकाश पाटील, पोलीस पाटील विनोद पद्माकर पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६०,१४३ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ गुन्हा दाखल करण्यात आला.