दैठणाकडे निघालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:49+5:302021-07-07T04:42:49+5:30
चिखली : परभणी जिल्ह्यातील दैठाणा पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर ...
चिखली : परभणी जिल्ह्यातील दैठाणा पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. तथापि कारवाई न झाल्यास संबंधित पोलीस स्टेशनला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने ५ जुलै रोजी पोलीस स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मंठा - जिंतूर मार्गावर रोखल्याने त्यांनी तेथेच रास्ता रोको आंदोलन केले.
दैठाणा पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्षांना मारहाणीचा निषेध नोंदवित याप्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या बुलडाणा शाखेव्दारे करण्यात आली होती. तथापि कारवाई न झाल्यास संबंधित पोलीस स्टेशनला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान याप्रकरणी कारवाई न झाल्याने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दैठाणाकडे जात असताना मंठा-जिंतूर मार्गावर चारठाणा पोलीस स्टेशन येथे त्यांना रोखण्यात आल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंठा - जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष देवीदास कणखर, स्वभापचे राज्य उपाध्यक्ष समाधान पाटील कणखर, भिकाजी सोळंकी, विलास मुजमुले, मुरली महाराज येवले, आत्माराम पाटील, तेजराव मुंडे, विवेक कणखर आदी सहभागी झाले होते.