परवानगीपेक्षा अधिक रेतीची साठवणूक; समीर दलाल यांना ८० लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 01:13 PM2021-07-27T13:13:23+5:302021-07-27T13:15:32+5:30
Khamgaon News : तहसीलदारांनी समीर दलाल यांना ८० लाखांचा दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून रेतीचे उत्खनन आणि साठवणूक केल्याप्रकरणी शासन निर्देशाची पायमल्ली करणे लिलावधारकाच्या चांगलेच अंगलट आले. परवानगीपेक्षा ७१० ब्रास अतिरिक्त रेतीची साठवणूक केल्याप्रकरणी लिलावधारक समीर दलाल यांना ७९ लक्ष ८३ हजार ९५० रुपयांचा दंड ठोठाण्यात आला. शेगाव येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे रेती माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटातून लिलाव धारकांकडून क्षमतेपेक्षा रेतीचा उपसा केल्या जात असल्याचे वास्तव माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उजेडात आणले. त्यानंतर सानंदा यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाºयांना तात्काळ स्थळ निरिक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी महसूल प्रशासनाला शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगी पेक्षा अधिक रेतीची उचल झाल्याची वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केल्यानंतर ७१० ब्रास रेतीचा अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी समिर दुष्यंत दला यांना दंड ठोठावण्यात आला आहे. आठ दिवसाच्या आत या दंडाचा भरणा करण्याची नोटीसही संबंधितास बजावण्यात आली आहे.
खुलासा संयुक्तीक नसल्याचा ठपका!
-माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या तक्रारीवरून ५ लिलावधारकांपैकी तीन लिलावधारकांवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. दरम्यान, समीर दलाल यांचा खुलासा संयुक्तीक नसल्याचा ठपका महसूल प्रशासनाने ठेवला असून विक्री रेकॉर्ड, हिशोब नोंदवही, मासिक नोंदवही, सीसी फुटेज, वाहतूक पासेस आणि अतिरिक्त रेतीसाठ्याबाबत संयुक्त खुलासा दलाल यांनी सादर केला नसल्याचेही तहसीलदार बोबडे यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.
परवानगी पेक्षा अतिरिक्त रेतीची साठवणूक, परवाना पासेससाठी बनावट दस्तवेज तयार करणे, रेती आणि रायॅल्टीची चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे लिलावधारकांकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी आपली मागणी आहे. विभागीय आयुक्तांनी नेमणूक केलेल्या पथकाकडून तांत्रिक पध्दतीने तपास केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.
- दिलीपकुमार सानंदा
तक्रारकर्ते तथा माजी आमदार खामगाव.