कडक संचारबंदीचा एसटी महामंडळाला फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:10 AM2020-07-27T11:10:44+5:302020-07-27T11:10:57+5:30
या संचारबंदीत एसटी महामंडळाने बस सुरू ठेवल्या असल्या तरी प्रवाशी न मिळाल्याने जिल्ह्यात एकही बस धावली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला दोन दिवसाच्या कडक संचारबंदीचा फटका बसत आहे. जिल्ह्यात शनिवार व रविवारी दोन दिवस कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. परंतू या संचारबंदीत एसटी महामंडळाने बस सुरू ठेवल्या असल्या तरी प्रवाशी न मिळाल्याने जिल्ह्यात एकही बस धावली नाही.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन २१ आॅगस्टपर्यंत करण्यात आलेले आहे. या दरम्यान जिल्ह्यात शनिवार व रविवार दोन दिवस कडक संचारबंदी आहे. या संचारंबदीमध्ये दवाखाने व मेडीकल ह्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. परंतू एसटी महामंडळाच्या बसेसला बंद ठेवण्याबाबतचे कुठलेही निर्देश नसले तरी, प्रवाश्यांअभावी शनिवारी सर्व बसेस उभ्याच होत्या. ५० टक्के प्रवाशी असल्यास बस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे. मात्र शनिवार व रविवारच्या कडक संचारबंदीमुळे एकही प्रवाशी बसस्थानकावर फिरकला नाही. त्यामुळे या संचारबंदीच्या दोन्ही दिवशी एसटीला फटका बसला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे एसटीचे अर्थचक्र बिघडलेले आहे. आर्थिक संकटात असलेल्या महामंडळाकडून उत्पनन वाढीसाठी तडजोड करण्यात येत आहे. त्यात मालवाहतूकीचा पर्याय एसटीसाठी फायद्याचा ठरला. मालवाहतूकीतून साडे सहा लाख रुपये उत्पन्न झाले आहे. परंतू प्रवाशी वाहतूकीचे गणित अद्यापही रुळावर आलेले नाही. शहरी भाग वगळता इतर ठिकाणच्या बसफेऱ्या प्रवाशांअभावी बंद कराव्या लागल्या. दोन दिवस पुकारलेल्या या बंदमुळे एसटीच्या आर्थिक संकटात आणखी भर पडणार आहे.
बसस्थानकावर शुकशुकाट
जिल्ह्यात शनिवार व रविवारी कडक संचारबंदीमुळे बुलडाणा बसस्थानकावरही शुकशुकाट दिसून आला. दोन्ही दिवस बसस्थानकावरून एकही बस गेली नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला आता प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या सातही आगारामध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही हजर नव्हते. सध्या एसटी बस चालक व वाहकांनाही ड्यूटीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
लॉकडाऊनमुळे शहरात शांतता
लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीमुळे शनिवार व रविवारी शहरात शांतता दिसून आले. चिखली रोड, मलकापूर रोडसह शहरातील जयस्तंभ चौक, संगम चौक, सर्क्युलर रोड, कारंजा चौक, धाड नाका या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रत्येक वाहनाची तपासणी होत असल्याने सर्वत्र शांतता दिसून आली. खासगी वाहनेही बंद करण्यात आली होती. नियम मोडणाºयांवर दंडात्मक कारवाई केली.