देऊळगाव राजात कडकडीत लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:43 AM2021-02-25T04:43:23+5:302021-02-25T04:43:23+5:30
देऊळगाव राजा : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यामध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अखेर प्रशासनाने १ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला ...
देऊळगाव राजा : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यामध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अखेर प्रशासनाने १ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सोमवारपासून शहरात शुकशुकाट बघायला मिळत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा पोलीस विभाग व नगरपालिका यांनी उगारला आहे. सोमवारी दिवसभरात २८ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ठाणेदार संभाजी पाटील यांनी दिली आहे.
येत्या आठ दिवसांसाठी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत किराणा दुकान, भाजीपाला, कृषी सेवा केंद्र यांना परवानगी देण्यात आली आहे तर दूध खरेदी-विक्री करणाऱ्या ठिकाणी दिवसातून दोन वेळा सूट देण्यात आली आहे. याशिवाय दवाखाने व मेडिकल यांना २४ तास सूट देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन गरजेचे झाले होते, कारण बाजारपेठेत लोकांची वाढलेली गर्दी, लग्नसमारंभात शेकडो वऱ्हाड्यांची हजेरी आणि दररोज वाढणारे रुग्ण यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नव्हता. अखेर सामान्य माणसाला पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले आहे. मंगळवारी देऊळगाव राजा शहरात किराणा, कृषी सेवा केंद्र, धान्याची दुकाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. संचारबंदी व लॉकडाऊनचे आदेश पारित होताच देऊळगाव राजा येथे ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मधुसूदन घुगे, पी. डी. भातनाते, पीएसआय खाडे व कर्मचारी यांनी तब्बल १०३ केसेस दाखल केल्या आहेत. विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणारे यांच्या विरोधात धडक मोहीम राबवित दंडात्मक कारवाई केली आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
पोलीस विभाग, नगरपालिका, महसूल विभाग यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी दिल्या आहेत तर मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता म्हणून विशेष मोहीम राबवली आहे.