कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:20+5:302021-04-15T04:33:20+5:30
दरम्यान अकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुर्वीच्या तुलनेत आताची संचारबंदी ही अधिक कड ...
दरम्यान अकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुर्वीच्या तुलनेत आताची संचारबंदी ही अधिक कड राहणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत. पोलिसांनी रात्रीच्या नाकाबंदीची तयारी केली असून दिवसा गर्दीची ठिकाणावर पोलिसांची नजर राहणार आहेत.
विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून, प्रमुख ठिकाणी व चौकांत चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी घराबाहेर पडले तर प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. मधल्या काळात दिवसा जमावबंदी होती व रात्री संचारबंदी होती. त्यावेळी प्रशासनानेही काही प्रमाणात नरमाईही भुमिका घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे निर्बंधांची अधिक कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरीत सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवली जाणार असून, छुप्या पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास सबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
--गर्दी नियंत्रणासाठी स्पेशल स्क्वॉड--
पोलिसांनी जिल्ह्यातील संभाव्य गर्दीची ठिकाणी हेरली असून अशा ठिकाणी प्रसंगी गर्दी झाल्यास स्पेशल स्क्वॉडच्या माध्यमातून कारवाई करून तेथील गर्दी नियंत्रणात आणण्यात येईल. यासोबतच रात्रीची नाकाबंदीही अधिक सतर्कतेने करण्यात येणार आहे. प्रसंगी पालिका कर्मचाऱ्यांचीही यासाठी मदत घेतली जाईल.
(अरविंद चावरिया, जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा)