खामगावात ऑटो, व्हॅन चालक, वाहकांचा संप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 03:32 PM2019-12-10T15:32:04+5:302019-12-10T15:32:12+5:30
खामगावातील दीडशेच्यावर वाहन चालक आणि वाहक संपावर गेले असून दोन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणाच्यावतीने उघडण्यात आलेल्या मोहिमे विरोधात खामगाव येथील ऑटो आणि व्हॅन चालकांनी दंड थोपटले आहे.
आरटीओ कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी खामगावातील दीडशेच्यावर वाहन चालक आणि वाहक संपावर गेले असून दोन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. वाहन चालक आणि वाहकांच्या या कामबंद आंदोलनामुळे खामगाव शहरातील अनेक पालक वेठीस धरल्या जात असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीचा प्रश्न उपस्थित करीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणाच्यावतीने गत आठ दिवसांपासून जिल्ह्यातील स्कूल बस आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनचालक आणि वाहकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया ऑटो, व्हॅन आणि इतर वाहन चालकांनी शनिवार पासून विद्यार्थ्यांची ने-आण बंद केली आहे. तर सोमवारी या वाहनचालक आणि वाहकांनी कडक बंद पुकारला. मंगळवारी देखील पुकारलेला संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. परिणामी, शहरातील अनेक पालकांना आपल्या पाल्यांची शाळेत ने-आण करावी लागत आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाने उघडलेल्या मोहिमेमुळे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि वाहनचालक वेठीस धरल्या जात आहेत. कारवाई विरोधात मंगळवारी देखील बंद पुकारलेला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने कठोर कारवाई करू नये.
- अजय मोटे
वाहन चालक, खामगाव.