प्रतिकूल परिस्थितीत दर्जेदार आराेग्य सेवा देण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:31 AM2021-03-08T04:31:55+5:302021-03-08T04:31:55+5:30
नागेश माेहिते / धाड : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,महिला आणि नवजात बालकांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आरोग्यसेविकांना अत्यंत प्रतिकूल ...
नागेश माेहिते / धाड : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,महिला आणि नवजात बालकांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आरोग्यसेविकांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावागावांत जाऊन आरोग्यसेवा द्यावी लागते. खेड्यातील सामाजिक स्थिती आणि आरोग्याची नसणारी काळजी अशाही परिस्थितीत आरोग्यसेविका कर्तव्य बजावतात.
प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ ता.बुलढाणा अंतर्गत येणाऱ्या सावळी येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेविका रंजना शेषराव देशमुख यांनी आपल्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून सावळी उपकेंद्रातील कुंबेफळ, ढालसावंगी, सावळी या तीन गावांत गरोदर महिला, नवजात शिशु,वयस्क नागरिक, किशोरवयीन मुली, शालेय विद्यार्थी यांना आरोग्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट सेवा देत आरोग्याचे उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सर्वत्र दहशत निर्माण करत आहे.
यासाठी सुरुवातीच्या काळात नागरिकांना गावाबाहेर क्वारंटाईन ठेवण्यापासून ते कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाच्या आजाराबाबत योग्य माहिती देत त्यांना दिलासा दिला. शासनाकडून वेळोवेळी आलेल्या आरोग्य मोहिमेत सहभागी होत कार्यक्षेत्रातील गावात विविध लसीकरण मोहीम,आरोग्य सर्वेक्षण मोहीम आणि सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेल्या कोरोनाच्या स्वॅब तपासणी मोहीम खेड्यात यशस्वीपणे राबविली. प्रसूती आणि प्रसूतीनंतर या काळात आरोग्य सेवा देऊन ग्रामीण महिलांना दिलासा दिला आहे. याठिकाणी कंत्राटी आरोग्यसेविका शिल्पा कचाटे यांनी प्रा. आ. केंद्र चांडोळ या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात प्रसूती करून सेवा दिली आहे. सावळी उपकेंद्रातील कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका, मदतनीस यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा उपक्रम आजही त्याच गतीने सुरू आहे.
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा साधनांचा अभाव असतानाही खेड्यात कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविकांची धडपड सुरू आहे.