एसटीच्या माल वाहतुक दरात प्रतिकिमी ४ रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:23 PM2021-01-19T12:23:10+5:302021-01-19T12:23:16+5:30
Buldhana News डिझेलच्या भावात वाढ झाल्याने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मालवाहतुकीच्या दरात ११ जानेवारीपासून प्रतिकिलोमीटर ४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या भावात वाढ झाल्याने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी बसने मालाची वाहतूक करणाऱ्यांना आर्थिक झळ बसणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २१ मे २०२० पासून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या मालवाहतूक सेवेचे दर कमी असल्यामुळे बुलडाणा विभागासह राज्यभरातून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण मागील अनेक महिन्यांपासून डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे महामंडळाने मालवाहतूक दरात वाढ करण्याचे आदेश ११ जानेवारी रोजी काढले आहेत.
कोरोना काळात सर्व प्रवासी एसटी बसेस उभ्या होत्या.
परिणामी एसटीचे उत्पन्न थाबंलेले होते. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवेला सुरुवात करण्यात आली. यासाठी एक किलोमीटर मालवाहतुकीसाठी ३८ रुपये प्रतिकिलोमीटर असे दर ठरविण्यात आले होते. आता नवीन आदेशानुसार या दरात वाढ करण्यात आली आहे.
यात तीन टप्पे पाडण्यात आले असून १०० किलोमीटरपर्यंत ४२ रुपये प्रतिकिलोमीटर, कमीत कमी ३ हजार ५०० रुपये दर ठरविण्यात आले आहेत. १०१ ते २५० किलोमीटरपर्यंत ४० रुपये प्रतिकिलोमीटर आणि २५१ किलोमीटरच्या पुढे ३८ रुपये प्रतिकिलोमीटर दर निश्चित करण्यात आले आहेत.
यामुळे आता १०० किलोमीटरच्या आत मालवाहतूक करणाºयांना प्रतिकिलोमीटर ४ रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.
आठ महिन्यात ६६ लाखांवर उत्पन्न
माल वाहतुकीच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला २१ मे २०२० ते १४ जानेवारी २०२१ या जवळपास ८ महिन्यांच्या कालावधीत ६६ लाख ७७ हजार ९०३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे लॉकडाउन काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागला. माल वाहतूक सेवेअंतर्गत जिल्ह्यातील सात आगारांपैकी खामगाव आगारातून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. त्या पाठोपाठ चिखली, मेहकर व बुलडाणा आगारातून उच्चांकी माल वाहतूक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माल वाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा आदेश एसटी महामंडळाच्या वतीने काढण्यात आला आहे. तरीदेखील खासगी माल वाहतुकीच्या दरापेक्षा एसटी महामंडळाचे दर कमी आहेत. यामुळे व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक