साफसफाई करण्यासाठी विद्यार्थ्यांना चढवले शाळेच्या छतावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 02:25 PM2019-01-25T14:25:56+5:302019-01-25T14:26:43+5:30
बोरी अडगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद आंबेटाकळी येथील शाळेत शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळेच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी शिक्षकांनी चक्क काही विद्यार्थ्यांना छतावर चढवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
- सचिन बोहरपी
बोरी अडगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद आंबेटाकळी येथील शाळेत शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळेच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी शिक्षकांनी चक्क काही विद्यार्थ्यांना छतावर चढवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शनिवारी, २६ जानेवारीनिमित्त सर्वत्रच साफसफाई मोहीम राबिवली जात आहे. सर्वच जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा होत असतो. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी सकाळी साफसफाई सुरु होती. साफसफाई करण्यासाठी कर्मचारी नाहीतर विद्यार्थ्यांनाच वापरले जात होते. मैदान साफ करणे ठीक आहे, पण शाळेच्या छतावर चढून साफसफाई करवून घेण्याचा प्रताप शाळेच्या शिक्षकांकड़ून केला जात होता. पहीली, दुसरीतील काही मुले शाळेच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करीत होते. तेवढयात काही पालक शाळेच्या समोरून जात होते. त्यांनी विद्यार्थ्यांना हटकले असता, विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षकांनीच छतावरील कचरा व झेंड्याजवळील जागा साफसफाई करण्यासाठी सांगितले अशी माहिती दिली. तेव्हा काही पालकांनी शिक्षकांना जाब विचारला. तेव्हा शिक्षकांनी हात झटकले. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याबाबत शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार करीत असल्याचे सांगितले.
शाळेच्या छतावर पाने पडली होती. ही पाने काढण्यासाठी काही विद्यार्थ्यांना छतावर चढवण्यात आले. शाळेत चपराशी नाहीत. विद्यार्थ्यांकडून आम्ही कामे करून घ्यायची नाहीत का मग ?
- संभाजी खुळे, मुख्याध्यापक, जि.प.शाळा आंबेटाकळी
सुदैवाने काही दुर्घटना झाली नाही. शिक्षक काय काही घडण्याची वाट पाहत होते काय. याप्रकरणाची शिक्षण विभागाने चौकशी करून संबधित शिक्षकांवर कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात मुलांसोबत असे प्रकार घडणार नाहीत.
- गोपाल ठाकरे, पालक, आंबेटाकळी.