विद्यार्थी गिरविताहेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:11 PM2018-12-21T12:11:43+5:302018-12-21T12:12:20+5:30
खामगाव : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी टिकविण्यासाठी शाळास्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येताहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी टिकविण्यासाठी शाळास्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येताहेत. शिक्षकांच्या अभिनव संकल्पनेतून आता विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाताहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या टिकविण्यास मदत होत असल्याचे दिसते.
नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? त्या नेमक्या कशामुळे ओढवतात? त्यांचा मानवी जीवनावर होत असलेल्या विपरीत परिणामाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा अंबोडा येथील वर्ग शिक्षिका एस.एल.तायडे यांनी एक प्रयोगशील उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमातील ‘माळीन गाव- एक दुर्घटना’ या पाठावर आधारीत कृतीयुक्त अध्यापनाची सांगड घालत उपक्रम तयार केला आहे. या उपक्रमात मुख्याध्यापक मुकुंद, शिक्षक चव्हाण, करवंदे, कुटे, सातपुतळे, गौर यांचेही सहकार्य लाभत आहे.
निसर्गाशी मैत्री!
या उपक्रमात डोंगर, दºया, भौगोलिक परिस्थिती, शेतीचा परिसर सुंदररित्या तयार करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांची आपोआप निर्सगाशी मैत्री होते. त्यामुळे या प्रयोगशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात रूची निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे मत आहे.