‘मानव विकास’च्या बससाठी विद्यार्थिनींचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:35 AM2017-08-09T00:35:10+5:302017-08-09T00:35:59+5:30
बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील विद्यार्थीनींसाठी एसटी प्रवासाची मोफत सेवा दिल्या गेली आहे, यात मानव विकास मिशन बस सेवा व अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सेवा या दोन प्रवाससेवा फक्त शालेय विद्यार्थिनीसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या आहेत. मात्र स्थानिक पातळीवर ही मोफत सेवा देण्यात एसटीचे अधिकारी कुचराई करताना दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थीनी मोफतप्रवास सेवेपासुन वंचित आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद या गावातील शेकडो विद्यार्थीनी दररोज शिक्षण घेण्यासाठी ५ किमी अंतरावरुन पायी जात आहेत. वारंवार एसटी महामंडळाकडे मागणी करूनही बस सेवा पुरविली गेली नाही. किनगावराजा येथे शाळेत जाण्यासाठी जंगलातून पायी वारी करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्रस्त विद्यार्थीनी व पालकांनी सरळ जिल्हा मुख्यालयी धाव घेतली व विभागीय नियंत्रक अनिल मेहतर यांची भेट घेऊन तक्रार करीत मानव विकास मिशनच्या बस सेवा सुरु करण्याची मागणी केली.
सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना शाळा सुटल्यानंतर सायंकाळी किनगावर राजा ते उमरद हा प्रवास जंगलातून पायी जावून पूर्ण करावा लागत आहे. पायी गावी परतावे लागत असल्याने पालकांनी यावेळी चिंता व्यक्त केली. आता तात्काळ बससेवा सुरु करून मुलींना न्याय द्यावा अशी मागणी पालकानी यावेळी केली आहे. आजपासून बससेवा सुरु केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप नेते विनोद वाघ यानी दिला आहे. हा प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा नसून संपूर्ण राज्यातील विद्यार्थिनीचा आहे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विनोद वाघ यांनी केली आहे.