वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 02:48 PM2020-03-01T14:48:08+5:302020-03-01T14:48:08+5:30
आॅटोरिक्षा, छोट्या व्हॅनसारख्या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विद्यार्थी वाहतुकीसाठी इतर खासगी वाहनांवर बंदी आहे. मात्र बुलडाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या वाहनांचा वापर होत आहे. एवढेच नव्हे तर आॅटोरिक्षा, छोट्या व्हॅनसारख्या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा ते घर असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
विद्यार्थ्यांना शाळा ते घर ये-जा करण्यासाठी स्कूल बसला आरटीओ विभागाकडून परवाना देण्यात येतो. यानुसार २२, २४ व ४० अशा विद्यार्थी क्षमतेच्या वाहनांना परवाना देण्यात आला आहे. याआधी ७ विद्यार्थी क्षमता असलेल्या वाहनांना देखील परवाना देण्यात येत होता. मात्र या वाहनासह खासगी वाहनांनी विद्यार्थी वाहतूक करण्यावर शासन निर्णयानुसार बंदी घालण्यात आली आहे. असे असताना जिल्ह्यात सात विद्यार्थी क्षमता असलेल्या छोट्या व्हॅनमध्ये १२ ते १५ विद्यार्थ्यांची वाहतुक केली जात आहे. याबरोबरच आॅटोरिक्षामध्ये तर तीन प्रवाशांची क्षमता असतानाही १० ते १२ विद्यार्थ्यांना अगदी कोंबून बसविल्या जाते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास आता धोकादायक बनला आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू, नये यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा धोकादायक प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.
पासिंग नसणाऱ्या ३३ स्कुल बसविरोधात कारवाई
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बसची आरटीओ विभागाकडून पासिंग करणे अनिवार्य असते. मात्र पासिंग न करताच विद्यार्थी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात ३३ स्कूल बसधारकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच बंदी विद्यार्थी वाहतूक करणाºया सुमारे २०० आॅटोरिक्षा वाहनांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परवाना नसताना विद्यार्थी वाहतूक करणाºया खासगी वाहनांवर आरटीओ विभागाची नेहमी नजर असते. नियम न पाळणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरी देखील असे प्रकार सुरू असल्याने पालकांनी देखील आपल्या पाल्यांना सुरक्षित वाहनानेच शाळेत पाठवावे. याचप्रमाणे शिक्षण विभागाने देखील पुरेशा स्कूल बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
-जयश्री दुतोंडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी