परीक्षेला उशिरा येणा-या विद्यार्थ्यांच्या नोंदी!
By admin | Published: March 9, 2017 01:50 AM2017-03-09T01:50:51+5:302017-03-09T01:50:51+5:30
पेपर व्हॉट्स अँपवर व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना.
गिरीश राऊत
खामगाव, दि. ८- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्या १२ वीच्या परीक्षेदरम्यान मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत पेपरच्या दिवशी सकाळी ११.00 पूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्स अँपच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या प्रकाराची शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच यापुढे असे प्रकार होऊ नये, याची खबरदारी घेत पेपरला उशिरा येणार्या विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतल्या जात आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने नऊ विभागीय मंडळांमार्फत १२ वीच्या परीक्षेस २८ फेब्रुवारीपासून, तर १0 वीच्या परीक्षेस ७ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. १२ वीची परीक्षा २५ मार्च, तर १0 वीची परीक्षा १ एप्रिल या कालावधीत होत आहे. १२ वीच्या परीक्षेदरम्यान मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत पे परच्या दिवशी सकाळी ११.00 वाजतापूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉटस अँपच्या माध्यमातून मोबाइलद्वारे परीक्षा केंद्राबाहेर गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकाराची शिक्षण मंडळाने गंभीरतेने दखल घेत या प्रकाराची शहानिशा विभागीय मंडळामार्फत सुरू करण्यात आली असून, त्यासाठी सायबर सेल व पोलीस खात्याकडे तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यासाठी १२ वीच्या पुढील परीक्षेसाठी व १0 वीच्या संपूर्ण परीक्षेसाठी उपाययोजना करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण मंडळाकडून संबंधितांना देण्यात आले आहेत.
राज्य मंडळामार्फत यापूर्वी ८ ऑक्टोबर २0१५ रोजी पाठविण्यात आलेले परिपत्रक व २८ फेब्रुवारी १७ रोजीचे पत्र यामध्ये सुचित केल्याप्रमाणे परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व परीरक्षक यांच्या व्यतिरिक्त अन्य घटक, विद्यार्थी यांच्याकडे परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनी (मोबाइल), टॅबलेट तत्सम साधने इंटरनेट इत्यादी सुविधा प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. असे असताना उपरोक्तप्रमाणे घटना घडणे ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. तरी याबाबत तातडीने योग्य नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करून त्याचा अहवाल वेळोवेळी राज्य मंडळास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
निर्धारित वेळेपूर्वी व विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता प्रश्नपत्रिकांची पाकिटे उघडली जाणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी व याबाबत सुचित करण्यात यावे व त्यांची योग्य अंमलबजावणी करून घ्यावी. यासाठी परीरक्षक केंद्रावर प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे स्वतंत्र सहायक परीरक्षक नेमण्यात यावा. या सहायक परीरक्षकासोबत प्रचलित पद्धती प्रमाणे संबंधित परीक्षा केंद्राच्या सीलबंद प्रश्नपत्रिका पाठविण्यात याव्यात. या सहायक परीरक्षकाने प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर दिल्यापासून उत्तरपत्रिका जमा करून परीरक्षक केंद्राकडे येईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे पूर्ण वेळ परीक्षा केंद्रावर थांबून निरीक्षण व नियंत्रण करावे.
अशी ठेवली जाणार करडी नजर
परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका हस्तांतरित केल्यानंतर निर्धारित वेळेत व विहित पद्धतीने प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे उघडण्याच्या व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर सहायक परीरक्षकाने प्रत्यक्ष नियंत्रण करावे.