विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती धोक्यात!

By admin | Published: July 5, 2017 12:07 AM2017-07-05T00:07:19+5:302017-07-05T00:07:19+5:30

लोकमत परिचर्चेतील सूर : संस्काराचे मोतीतून वाचनाची क्षमता होते वृद्धिंगत!

Students in danger of reading culture! | विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती धोक्यात!

विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती धोक्यात!

Next

बुलडाणा : गत काही वर्षांमध्ये शैक्षणिक पद्धतीत झालेला बदल व सुरू झालेली स्पर्धा विद्यार्थ्यांमधील वाचन कमी करण्याला कारणीभूत ठरत असून, हे धोकादायक असल्याचे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित परिचर्चेतून निघाला. विद्यार्थ्यांमधील वाचन कमी होण्याला पालक, शिक्षण तसेच शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी मांडली. ‘विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती कमी होतेय का?’ या विषयावर मंगळवारी परिचर्चा घेण्यात आली. यावेळी शहरातील शाळांचे मुख्याध्यापक तसेच प्रतिनिधींचा समावेश होता.

संस्काराचे मोतीचा दिल्या जातो ‘होमवर्क’
विद्यार्थ्यांमध्ये वाचन वाढावे, याकरिता आमच्या शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबविल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना संस्काराचे मोती स्पर्धेतील पानाचे वाचन करून त्यातील नोंदी काढण्याचेही सांगण्यात आले असल्याचे महात्मा फुले शाळेच्या मुख्याध्यापिका मानकर यांनी सांगितले.

पूर्वी आमच्या शाळेत विद्यार्थ्यांकरिता वाचनासाठी विशेष तासिका होत्या; मात्र सध्या शैक्षणिक धोरण बदलले आहे, त्यामुळे आता ते शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याकरिता शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. मुले पुस्तके वाचतच नाहीत. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांऐवजी ते नोट्स वाचण्यावर अधिक भर देतात. आता वाचनाची माध्यमे बदलली आहेत. इंटरनेटवर मुलांनी वाचन करणे गरजेचे आहे. - गिरीश चौधरी,
शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वाचन वाढविण्याकरिता विशेष तासिकाच नाही. वाचन करणे हा अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे; मात्र वाचनाकडे प्रचंड दुर्लक्ष केल्या जाते. शासन स्तरावर विद्यार्थ्यांचे वाचन वाढविण्याकरिता कोणतेही प्रयत्न होत नाही. पालकही मुलांनी वाचन करावे, याबाबत उदासीन आहेत, तर शिक्षकही मुलांमध्ये वाचन वाढावे, ही आपली जबाबदारी, असे मानायला तयार नाहीत. मुले केवळ अभ्यासापुरती पुस्तके वाचतात. त्यांच्यामधील उत्सुकताच संपली आहे. मुलांमध्ये वाचन वाढावे, याकरिता आम्ही बालमैत्री वाचनालये सुरू केली आहेत.
- नरेंद्र लांजेवार,
साहित्यिक तथा ग्रंथपाल, भारत विद्यालय, बुलडाणा.

आम्ही विद्यार्थ्यांमध्ये वाचन वाढावे, याकरिता वाचनालय सुरू केले आहे. तसेच क्युरासिटी कॉर्नरही सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते, तसेच त्यामध्ये विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसेही दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. ई-लर्निंग विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे. इंटरनेटवर विद्यार्थ्यांना चांगली माहिती मिळते. याचा वापर वाढत आहे. याला सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायला हवे.
- प्रमोद मोहोरकर,
मुख्याध्यापक, शिवसाई कॉन्व्हेंट, बुलडाणा.

आम्ही शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी, याकरिता विविध वर्तमानपत्रे, मासिके लावली आहेत. विद्यार्थ्यांचा वाढदिवस असला तर त्यांना आम्ही चॉकलेट वाटण्याऐवजी शाळेला एक पुस्तक भेट देण्याचे सांगतो. त्यामुळे अनेक पुस्तके वाचनालयात जमा झालेली आहेत. ही पुस्तके मुले वाचतात. सध्या वाचन संस्कृती कमी झालेली आहे. हे सत्य असले तरी वाचनाची माध्यमही बदलली आहेत. वाचन कमी होण्यामागे सध्या असलेली सीस्टिमच कारणीभूत आहेत. अभ्यासासाठीच पुस्तके वाचणे चुकीचे आहे.
- प्रा. गजानन इंगळे,
मुख्याध्यापक, विवेकानंद गुरुकुंज, तथा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथ. शिक्षक/शिक्षकेतर महासंघ.

१९९५ पासून आमच्या शाळेत वाढदिवसानिमित्त शाळेत चॉकलेट वाटण्याऐवजी पुस्तके भेट देण्याचा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत चार हजार पुस्तके गोळा झाली आहेत. कार्यानुभवाच्या तासिकेच्या वेळी शाळेत विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेण्यात येते. वाचन संस्कृती कमी होण्याकरिता सध्याचे वातावरणही कारणीभूत आहे. विद्यार्थी केवळ परीक्षेसाठीच अभ्यास करतो. अवांतर वाचन करीत नाही. पालकही त्याला अवांतर वाचन करू देत नाहीत, हे चुकीचे आहे. आम्ही शाळेत विद्यार्थ्यांचे वाचन वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबवितो.
- स्नेहलता मानकर,
मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कूल, बुलडाणा

शाळेत शिकविताना शिक्षकांना शिक्षणामध्ये आवड असायला हवी. केवळ औपचारिकता म्हणून शिक्षकांनी शिकवायला नको. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता भाषा शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. कविता, कथा शिकविताना शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्या वातावरणात घेऊन जायला हवे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन वाढविण्याकरिता शासन, पालक व शिक्षकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.
- आर.ओ. पाटील,
मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कूल, बुलडाणा.

आम्ही शाळेत ग्रंथपेट्या बनविल्या आहेत. या ग्रंथपेट्यांमधील पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते. वाचन संस्कृतीपासून विद्यार्थी दूर गेला आहे. याला कारणीभूत पालक, शिक्षक व शासन आहे. शाळा शाळांमध्ये वाचन वाढविण्याकरिता प्रयत्न करायला हवेत. पुस्तकांवर स्पर्धा ठेवायला हवी. विविध प्रकारचे ग्रंथ विद्यार्थ्यांना वाचायला द्यायला हवे. त्यांच्याकडून त्या पुस्तकामध्ये काय आहे, याचा एक लेख लिहून घ्यायला हवा, असे केल्यास वाचन वाढेल. शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे.
- एन. एच. पठाण,
शिवाजी हायस्कूल, बुलडाणा.

Web Title: Students in danger of reading culture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.