तंत्रनिकेतनच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:24 AM2020-08-26T11:24:09+5:302020-08-26T11:24:19+5:30
अगदी आठ दिवसात नॉनक्रिमीलेअरसह जात प्रमाणपत्र न मिळविता आल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तंत्रनिकेतन अभ्यासक्नमाला आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ आॅगस्टपासून सुरू केली होती आणि २५ आॅगस्ट रोजी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. पण दहावीच्या गुणपत्रिकेसह शैक्षणिक दाखले हे १७ आॅगस्टला मिळाले. त्यामुळे अगदी आठ दिवसात नॉनक्रिमीलेअरसह जात प्रमाणपत्र न मिळविता आल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. परिणामी काही विद्यार्थ्यांना खुल्या गटातून अर्ज करावे लागले.
शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार जात प्रमाणपत्र अर्ज केल्यानंतर २१ दिवसांनंतर,नॉनक्रिमीलेअर २१ दिवसांनी तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागतो. तंत्रनिकेतनला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना केवळ आठ दिवसात ही कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. जात प्रमाणपत्र मिळेपर्यंत खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला तरी अधिवास प्रमाणपत्राची गरज आहे, तसेच प्रवेश घेतल्यानंतर तीन ते चार दिवसांचा अवधी मिळाल्यानंतरही जात प्रमाणपत्र आणि नॉनक्रिमीलेअर सादर न केल्यास त्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा खुल्या गटात होणार आहे. दरम्यान, जातीचे दाखले व नॉन क्रिमीलिएर सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्याची मागणी होत आहे.
जात प्रमाणपत्रांसाठी विशेष शिबिर हवे!
तंत्रनिकेतनसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठ दिवसात कुठल्याही स्थितीत जातीचे व नॉनक्रिमीलेअर दाखले मिळणे शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने तालुका स्तरावर विशेष शिबिर घेऊन जात प्रमाणपत्रासह नॉनक्रिमीलेअरचे वितरण करण्याची गरज आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, अशी विद्यार्थी पालकांनी मागणी केली आहे.