ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:25+5:302021-09-16T04:42:25+5:30
शासनाच्या ‘शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत सध्या किनगावराजा व आजूबाजूच्या परिसरातील गुरुजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देताना ...
शासनाच्या ‘शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत सध्या किनगावराजा व आजूबाजूच्या परिसरातील गुरुजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देताना सध्या दिसत आहेत. परंतु, विद्यार्थी अशा ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणात अजूनतरी पूर्णतः समर्पित झालेले दिसत नाहीत. शासनाने ज्या गावात एकही कोरोना रुग्ण नाही, त्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. परंतु, पहिली ते सातवी या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला सरकारकडून कोरोना प्रसाराच्या भीतीमुळे शाळा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र, ग्रामीण आणि शहरी भागात विविध राजकीय कार्यक्रम आणि लग्न सोहळे हे विनामास्क आणि गर्दी करून कुठलेही कोरोनाचे नियम न पाळता राजरोस पद्धतीने होत आहेत. मग अशा कार्यक्रमांना शासन कशी काय परवानगी देते, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडत आहे.
अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित
शाळा बंद असल्या तरी शाळेवर शिक्षकांची उपस्थिती शासनाने शंभर टक्के अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांना पालक आणि विद्यार्थी हे शाळा नियमितपणे कधी सुरू होणार, याची सतत विचारणा करीत आहेत. विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन शिक्षण दिले जाते. परंतु, या ऑनलाइन शिक्षणातही खूप अडचणी निर्माण होत आहेत. काही पालकांकडे मोबाइल घेण्याची ऐपत नसल्यामुळे असे विद्यार्थी ऑनलाइन क्लास करू शकत नाहीत, अशा समस्याही आहेत. काही पालकांनी आपल्या मुलांना मोबाइल उपलब्ध करून दिला आहे. परंतु ग्रामीण भागात नेहमी असलेल्या नेटवर्कच्या अडथळ्यामुळेही विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करून दररोज शाळा जर सुरू झाल्या तर योग्य राहतील, अशा प्रतिक्रियाही पालकांच्या येत असल्याचे चित्र आहे.
इतर कार्यक्रम सुरू, मग शाळा बंद का?
शासन निर्णयानुसार १७ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, प्राथमिक स्तरावर शाळा सुरू करण्यास सरकारकडून कोणताही निर्णय अजून झाला नाही. सरकार शाळा सुरू करण्यास परवानगी देत नाही आणि इतर सार्वजनिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम सर्रासपणे सुरू आहेत, याची चर्चा पालक वर्गात सुरू असून योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.