प्लास्टिकच्या निर्मुलनासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:46 PM2019-09-25T16:46:58+5:302019-09-25T16:47:04+5:30
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क स्वत:च्या हातांनी शेकडो आकर्षक कापडी पिशव्याही तयार केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी एक कृतीशील उपक्रम हाती घेत, प्लास्टिकच्या निमुर्लनासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी ‘नो प्लास्टिक’ या मोहिमेतंर्गत सुटाळा बु. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क स्वत:च्या हातांनी शेकडो आकर्षक कापडी पिशव्याही तयार केल्या. इतकेच नव्हे तर या कापडी पिशव्यांचे प्रदर्शन भरवित प्लास्टिकच्या वापराला विरोध दर्शविला.
‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेतंर्गत खामगावसह जिल्ह्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्लास्टिक निमुर्लनासाठी शासनस्तरावरून ११ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. यामोहिमेतंर्गत जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, यामोहिमेत विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा (मुले) या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला कृतीशील साद दिली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुटाळा बु. येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोपळे, गणेश पवार, मुख्याध्यापक बी.डी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज वानखडे, सोनाजी कळसकार, सातव यांच्याहस्ते करण्यात आले.
संचलन एस.एम. बायस्कर यांनी केले. आभार आर. ओ. वाघ यांनी मानले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
चिमुकल्यां विद्यार्थ्यांकडून जनजागृती!
प्लास्टिक हानीकारक असल्याचा संदेश देण्यासाठी सुटाळा येथील मराठी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी कापडी पिशव्या तयार केल्या. या पिशव्या तयार करताना टाकाऊ कापडांचा वापर करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने या पिशव्या तयार केल्या आहेत. यामध्ये जुन्या साडी आणि ड्रेसच्या लेसचाही कल्पकतेने वापर करण्यात आला आहे.
शिक्षिकांची संकल्पना !
सुटाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन दिले. तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ‘टाकाऊ पासून टिकाऊ ’कापडी पिशव्या तयार करण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर शिक्षिका कु. एस. पी. देवगुंडे, सौ. आर.एच.चव्हाण, कु. एम. ए.हुरपडे यांच्या संकल्पनेतून शाळेत कापडी पिशव्यांची प्रदर्शन भरविण्यात आले.