जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर केले कळसुबाई शिखर
By संदीप वानखेडे | Published: February 10, 2024 04:35 PM2024-02-10T16:35:11+5:302024-02-10T16:37:53+5:30
देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगांव बु. शाळेचा उपक्रम.
संदीप वानखडे, देऊळगाव राजा : भिवगाव बु़ जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई (१६४६ मीटर) सर केले. या विद्यार्थ्यांनी खडतर प्रवास करू हे यश मिळवले आहे़.
शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांसाठी आनंदाचे क्षण विविध ऐतिहासिक, निसर्गरम्य स्थळांना प्रत्यक्ष भेटीद्वारे होणारा अभ्यास, त्यातच महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले शिखरावर चढणे म्हणजे एक विक्रमच म्हणावा लागेल. असाच एक विक्रम जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा भिवगांव बु. ता. देऊळगांव राजा, जि. बुलडाणा येथील विद्यार्थ्यांनी केला आहे.
खडतर मार्ग, वळणदार रस्ते, लोखंडी शिड्या, आजूबाजूला खोल दऱ्या असलेले शिखर जि. प. भिवगांव बु. च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या हिमतीवर सर केले. शिखरावर पोहोचल्यावर विद्यार्थ्यांच्या व गुरुजींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा वेगळाच होता. जिद्द, हिंमत, न घाबरता कळसुबाई शिखर सर करणारी जिल्हा परिषद भिवगांव बु. ही देऊळगांव राजा तालुक्यातील पहिलीच जिल्हा परिषद शाळा, तसेच बुलडाणा जिल्ह्यातील दुर्मीळच शाळा म्हणावी लागेल. शाळा नेहमीच शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन विविध उपक्रमात अग्रेसर असते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मिळाले यश :
विद्यार्थ्यांच्यासोबत शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आंधळे, कायंदे, दराडे, बाबर व भोरजे सर्वांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे, जबाबदारीने, मोठी हिंमत दाखवून हा यशस्वी विक्रम घडवून आणला. भिवगांव बु. शाळेचे मुख्याध्यापक वाघ, भालके, तागवाले, कासतकर यांनी सहलीचे उत्तम प्रकारे नियोजन केले. केंद्रप्रमुख सोनूने, गटशिक्षणाधिकारी मुसदवाले व माननीय शिक्षणाधिकारी खरात यांचे सहकार्य लाभले.