मोफत सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 06:56 PM2018-11-22T18:56:11+5:302018-11-22T18:56:14+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून खामगाव तालुक्याची नोंद झाली आहे.
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून खामगाव तालुक्याची नोंद झाली आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत सवलत पासचा लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) घेतला. त्यानुसार मोफत सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची बसस्थानकावर गर्दी होत आहे. गुरूवारी विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याने, चार विद्यार्थ्यांना भोवळ आली. विद्यार्थ्यांची वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बस स्थानकावर पाचारण करण्यात आले.
खामगाव तालुक्यातील विविध खेड्यातील सुमारे ५ हजार विद्यार्थी सवलत पासच्या आधारे शिक्षणासाठी खामगाव येथे प्रवास करतात. या विद्यार्थ्यांच्या मासिक सवलत पासची मुदत दिवाळीत संपली. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरूवारी मोफत पासेससाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. मोफत पासचा शेवटचा दिवस असल्याच्या गैरसमजातून गुरूवारी बस स्थानकात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी झाली. काही विद्यार्थी पहाटेपासूनच रांगेत लागले. वाढत्या गर्दीमुळे श्वास कोंडल्या गेल्याने, चार विद्यार्थ्यांना बस स्थानकात भोवळ आली. ही बाब राजकीय पदाधिकाऱ्यांना समजताच, शिवसेनेचे प्रा. अनिल अंमलकार, जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाबा काळे, विद्यार्थी नेते नितेश खरात यांनी बसस्थानकावर भेट दिली. प्रा. अनिल अंमलकर यांनी स्थानक प्रमुख योगेश वांदे यांच्यासोबत चर्चा केली.
पासेससाठी अतिरिक्त खिडक्या!
विद्यार्थ्यांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुरूवारी बस स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या उघडण्यात आल्या. विद्यार्थींनीसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, गर्दीवर नियत्रंण मिळविण्यासाठी गुरूवारी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
सुटीच्या दिवशीही सुरू राहणार खिडकी!
शुक्रवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशीही मोफत सवलत पासची खिडकी सुरू राहील. मोफत सवलत पास तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दिली जाईल. यासाठी चार जणांची हंगामी ड्युटी देखील लावण्यात आली आहे.
मोफत सवलतीचा लाभ तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांच्या पासेस एकाचवेळी संपल्यामुळे गुरूवारी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. मात्र, एसटी प्रशासनाकडून सर्वांना तात्काळ वाढीव सुविधा व्यवस्था करण्यात आली. तशा सूचनाही स्थानकप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
- आर.आर. फुलपगारे
आगार व्यवस्थापक, खामगाव.
------------------
कोणत्याही विद्यार्थ्यांला भोवळ आल्याचे निर्दशनात नाही. विद्यार्थ्यांनी गैरसमज वाढविल्याने बसस्थानकात गर्दी वाढली. अतिरिक्त कर्मचारी लावून पासेस दिल्या जाताहेत. सुटीच्या दिवशीही पासेस दिल्या जातील.
- योगेश वांदे
स्थानक प्रमुख, खामगाव.