शेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणार ३५ लाख
By admin | Published: June 30, 2017 12:51 AM2017-06-30T00:51:43+5:302017-06-30T00:51:43+5:30
यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे!
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व नगर परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमधील ८७१५ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रती विद्यार्थी दोन गणवेशाकरिता ४०० रुपयांप्रमाणे ८७१५ विद्यार्थ्यांना ३४,८६,००० गणवेश रुपये अनुदान रक्कम देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांच्या पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यामध्ये वर्ग १ ते ८ मधील सर्व मुली ५५५३, एससी मुले १६१९, एसटी मुले १६८ व बीपीएल मुले १३७५, असे एकूण ८७१५ विद्यार्थ्यांना ३४,८६,००० गणवेश रुपये अनुदान रक्कम देण्यात येणार आहे.
गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांची आढावा सभा घेऊन गणवेश खरेदीबाबत मार्गदर्शन केलेले असून, गणवेश खरेदीबाबत अटी व शर्तीच्या लेखी स्वरूपात सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत या सत्रापासून गणवेश योजनेचे अनुदान डीबीटी धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेगाव तालुका अंतर्गत एकूण लाभार्थी संख्या ८७१५ असून, जिल्हा कार्यालयाकडे ३४,८६,००० रुपये गणवेश अनुदानाची मागणी केली आहे. तालुका स्तरावर सदर योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल व त्यानंतर मुख्याध्यापक हे पालकांनी आपल्या पाल्यासाठी दोन गणवेश खरेदी करून, त्याची पावती मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांच्या खात्यात सदर पावतीनुसार रक्कम वर्ग करतील.
तसेच सर्व शिक्षा अभियान मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी विभागीय पाठ्यपुस्तक मंडळ अमरावती यांच्याकडून मागणीनुसार मराठी माध्यमाचे १३८१९, इंग्रजी माध्यमाची ७५३ व उर्दू माध्यमाची २८७१ एवढी पाठ्यपुस्तके शेगाव तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करण्यात आली आहेत.
शेगाव तालुक्यांतर्गत एकूण नऊ केंद्र असून, त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा ७६, नगर परिषदेच्या १४ व खासगी अनुदानित २० अशा एकूण ११० शाळांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ सन १७-१८ या शैक्षणिक वर्षात देण्यात आला. त्यात ग्रामीण भागातील आठ केंद्रातील शाळांना पाठ्यपुस्तके पोहच केली. उर्वरित नगर परिषद क्षेत्रातील पाठ्यपुस्तकांचे वितरण २७ जून रोजी झाले.