सापासोबत स्टंटबाजी; वनविभागाकडून युवकाचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:51 PM2018-11-12T13:51:36+5:302018-11-12T13:52:17+5:30
खामगाव : वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासारख्या विषारी प्राण्यासोबत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
- योगेश फरपट
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव : वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासारख्या विषारी प्राण्यासोबत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची दखल घेवून अशा युवकांना रोखणे गरजेचे झाले आहे.
वन्यप्राण्यांसोबत छेडखानी करणे हा गुन्हा आहे हे माहिती असतानाही जंगलात अशा प्राण्यांचा शोध घेवून त्यांना पकडून त्यांच्यासोबत खेळ केल्या जातो. साप, पोपट, ससा, हरिण, काळवीट, बीबट, मोर यासारख्या प्राणी व पक्षांचा समावेश आहे. शासनामार्फत कडक कायदे केल्यानंतरही या प्रकारांना रोखणे वनविभागासमोर आव्हान ठरत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची राहते. मात्र शहरासह जिल्हयात असे प्रकार रोखण्यात वनविभागाला अपयश येत असल्याचे दिसून येते. गारुड्याचे खेळ करणे, पोपट पाळणे, पोपट विकणे, ससा, लांडोर, मोर यांची शिकार करणे, घोरपडची शिकार करणे आदी प्रकार सर्रास घडत आहेत. या प्रकारांना आळा घालून वन्यप्राण्यांचे रक्षण करण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.
सापासोबत स्टंटबाजी
खामगाव शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर सापासोबत स्टंटबाजी करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातील युवक कोब्रा (नाग) सोबत स्टंटबाजी करतांना दिसत आहे. चष्मा, पायासोबत त्याला डिचवत आहे. यात युवकाच्या व मित्रांच्या जीवालाही धोका संभवतो. मात्र त्याची कोणतीही पर्वा युवकाला दिसत नसून सापासोबत तीन मिनिट हा युवक खेळ करीत आहे.
वन्यप्राण्यासोबत खेळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सापाबाबतीत सांगायचे झाल्यास सापाच्या प्रजातीनुसार गुन्हा कोणता हे सांगता येईल. सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून संबधित युवकाचा शोध घेतल्या जाईल व निश्चित कारवाई केली जाईल.
- सचीन शिंदे, प्रादेशीक वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव