एक लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी अटकेत; वकिलासह अव्वल कारकूनही जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 07:08 IST2022-12-29T07:07:40+5:302022-12-29T07:08:02+5:30
उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यातर्फे खासगी वकील ॲड. आनंद शिवाजीराव देशमुख यांनी ही लाच स्वीकारली.

एक लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी अटकेत; वकिलासह अव्वल कारकूनही जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा: जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यातर्फे खासगी वकील ॲड. आनंद शिवाजीराव देशमुख (३२) यांनी ही लाच स्वीकारली. त्यांच्या सोबतच या प्रकरणात मध्यम प्रकल्प भूसंपादन कार्यालयातील नागोराव महादेवराव खरात हा अव्वल कारकून तिसरा आरोपी आहे.
सापळा रचून पोलिसांची कारवाई
- २६ डिसेंबर रोजीच्या पडताळणीदरम्यानही उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच लाच देण्यासाठी अव्वल कारकून नागोराव महादेवराव खरात यांनी तक्रारकर्त्यास प्रेरित केल्याचे समोर आले होते.
- या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
- ही कारवाई बुलढाणा एसीबीचे प्रभावी पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सचिन इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"