तीन हजारांची लाच घेताना उपकोषागार अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 18:48 IST2020-12-08T18:45:58+5:302020-12-08T18:48:44+5:30
Buldhana News प्रमोद आनंदराव मोहोड (४७, रा. मलकापूर) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

तीन हजारांची लाच घेताना उपकोषागार अधिकाऱ्यास अटक
बुलडाणा: तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाचे दोन महिन्याचे मानधनाचे देयक काढून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या व पंचासमक्ष त्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये स्वीकारणाऱ्या मोताळा येथील उपकोषागार अधिकारी (वर्ग ३) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आठ डिसेंबर रोजी सायंकाळी रंगेहात अटक केली.मोताळा येथील उपकोषागार कार्यालयातच ही लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी (वर्ग ३) प्रमोद आनंदराव मोहोड (४७, रा. मलकापूर) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. अलिकडील काळातील ही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची एक मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे मोताळा येथील तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने अनुषंगीक विषयान्वये तक्रार केली होती. त्यांचे दोन महिन्याचे मानधन काढण्यासाठी उपकोषागारातील अधिकारी प्रमोद मोहोड यांनी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारकर्ते शिक्षकही मलकापूर येथील रहिवाशी आहेत. दरम्यान लाच देण्याची इच्छा नसल्याने तंत्रनिकेतनमधील शिक्षकाने ही तक्रार केली होती. त्यानुषंगाने आठ डिसेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केली असता आरोपी प्रमोद आनंदराव मोहोड यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते. सायंकाळ दरम्यान प्रत्यक्षा लाच घेताा आरोपी प्रमोद मोहोड यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सध्या अटके संदर्भातील सविस्तर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागक करत आहे.
या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक तथा पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ, पोलिस नायक विलास साखरे, पोलिस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोलिस कॉन्स्टेबल अरशिद यांनी सहभाग घेतला. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.