‘मर्जी’तील नगरसेवकांना विषय समितीची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:31 PM2018-12-29T12:31:58+5:302018-12-29T12:32:09+5:30

स्थानिक आमदार आणि पक्ष श्रेष्ठींच्या ‘मर्जी’तील नगरसेवकांनाच विषय समिती सभापतीपदाची ‘संधी’ दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

Subject committee opportunity for municipal corporators! | ‘मर्जी’तील नगरसेवकांना विषय समितीची संधी!

‘मर्जी’तील नगरसेवकांना विषय समितीची संधी!

googlenewsNext

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:  बुलडाणा जिल्ह्यातील ९ नगर पालिकांमध्ये नववर्षांच्या सुरूवातीलाच विषय समिती निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पालिकांमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्याचवेळी स्थानिक आमदार आणि पक्ष श्रेष्ठींच्या ‘मर्जी’तील नगरसेवकांनाच विषय समिती सभापतीपदाची ‘संधी’ दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ११ नगर पालिका आणि २ नगर पंचायती आहेत. यामध्ये ११ नगर पालिकांपैकी बुलडाणा आणि खामगाव या दोन मोठ्या नगर पालिकांसह ९ नगर पालिकांमध्ये येत्या ५ जानेवारी रोजी विषय सभापती निवड सभा पार पडणार आहे. तारखेनुसार गृहीत धरल्यास विषय सभापती निवड सभेला आठवडा भराचा अवधी असला तरी, प्रत्यक्षात गेल्या महिनाभरापासूनच विविध पालिकांच्या वर्तुळात या सभापती निवड सभेच्या अनुषंगाने हालचाली वाढीस लागल्या आहेत. 

जिल्ह्यातील घाटाखालील खामगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर  या पाच पालिकांमध्ये तर घाटावरील बुलडाणा, मेहकर, चिखली आणि देऊळगाव राजा या चार पालिकांमध्ये विषय सभापती निवड सभा पार पडणार आहे. त्यादृष्टीकोनातून या पालिकांमधील राजकीय वातावरण तापले असून, नगरसेवकांकडून वरिष्ठांच्या भेटी घेतल्या जाताहेत. सत्ताधारी आमदारांसह, जिल्हाध्यक्ष आणि नगराध्यक्षांची भूमिका विषय सभापती निवडणुकीमध्ये महत्वाची ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वर्णी!

घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद आणि शेगाव नगर पालिकेवर अनुक्रमे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर आणि आ. संजय कुटे यांचे तर नांदुरा नगर पालिकेत आ. चैनसुख संचेती यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद , नांदुरा या पालिकांमधील विषय समिती सभापती निवडणुकीवर आमदारांचाच वरचष्मा राहणार असल्याचे दिसून येते. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीय समिकरणाच्या आधारे नगरसेवकांची विषय समिती सभापतीपदी वर्णी लागणार असल्याचे संकेत आहेत.

खामगाववर अनेकांची नजर!

जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका म्हणून नाव लौकीक असलेल्या खामगाव नगर पालिकेतील विषय सभापती निवडणुकीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागून आहे. याठिकाणी नवीन चेहºयांना संधी दिली जाते की, आधीच्या सभापतींना पुन्हा संधी दिली जाते, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. विषय समिती सभापदीपदी आपलीच वर्णी लागावी, यासाठी काही नगरसेवकांनी त्यादृष्टीकोनातून हालचाली सुरू केल्या आहेत. खामगाव पालिकेत आ. आकाश फुंडकर ठरवतील त्या नगरसेवकाचीच विषय समिती सभापतीपदी वर्णी लागेल, एवढे मात्र, निश्चित!

Web Title: Subject committee opportunity for municipal corporators!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.