हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय- दादाजी भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:32 PM2020-11-21T15:32:48+5:302020-11-21T15:32:59+5:30
Dadaji Bhuse News हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय आहे, असे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुलडाणा येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची शिकवण आम्हास दिली आहे. शिवसेनेचे हिंदुत्व पाठीत खंजीर खुपसण्याचे नाही, असे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुलडाणा येथे व्यक्त केले.
अमरावती शिक्षक मतदार संघाच्या संदर्भाने महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यासाठी २० नोव्हेंबरला ते बुलडाणा येथे आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मुंबई महानगर पालिकेच्या आगामी काळातील निवडणुकांच्या संदर्भाने हिंदुत्व हा मुद्दा घेवून भाजप समोर येत असल्याची चिन्हे आहेत. त्यासंदर्भाने त्यांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई महानगर पालिकेच्या २०२२ मधील निवडणुकींच्या अनुषंगाने भाजप हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याच्या भूमिकेत आली आहे. यासंदर्भात भाजपच्या राज्य कार्यकारणीचीही बैठक झाली होती. भाजप नेत्यांची येणारी वक्तव्ये पाहता याबाबत बुलडाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये कृषीमंत्री दादाजी भुसे यांना विचारणा केली असला शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेले हिंदुत्व आम्ही जोपासतो. त्यांनी दिलेली शिकवण ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पाठीत खंजीर खुपसणारे हिंदुत्व आमचे नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे येत्या काळात हिंदुत्व हा मुद्दा राजकारणात चांगलाच चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे वीज देयकांच्या माफी संदर्भात विचारणा केली असता कॅबिनेटच्या बैठकीत राज्यात उर्जा विषयक ६४ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी ४० हजार कोटी ही कृषी विभागाची थकबाकी आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे अनुषंगीक मुद्द्यावर आपण बोलणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टींना शिवसेना प्राधान्य देते असे ते म्हणाले.
बुलडाण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रीतील काही नवीन कृषी महाविद्यालयांचा मुद्दा विचाराधीन असून आम्ही सकारात्मक आहोत. मात्र सध्याची आचारसंहिता बघता यावर बोलणे उचित होणार नाही, असे ते म्हणाले. कृषी महाविद्यालयासंदर्भातील अहवालावर राज्यपालांनी काही आक्षेप नोंदवले होते. त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे आ. डाॅ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. एस. लहाने, नरेश शेळके यांच्यासह शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.