चिखली कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:22+5:302021-04-15T04:33:22+5:30
बुलडाणा : चिखली येथे सर्व सुविधांनी युक्त असे समर्पित कोविड रुग्णालय सुरू करा अशी मागणी गेल्या वर्षभरापासून ...
बुलडाणा : चिखली येथे सर्व सुविधांनी युक्त असे समर्पित कोविड रुग्णालय सुरू करा अशी मागणी गेल्या वर्षभरापासून आमदार श्वेता महाले करीत आहेत . त्यावर येत्या सोमवार पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री ना . डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोरोनाच्या हाहाकार व जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची १४ एप्रिल राेजी तातडीची बैठक घेतली़ या बैठकीत आमदार श्वेता महाले पाटील यांनी चिखली येथे समर्पित कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली असता वरील आदेश देण्यात आले आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर संजय कुटे , आमदार संजय रायमुलकर , आमदार संजय गायकवाड , आमदार राजेश एकडे ,जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार , जिल्हाधिकारी राममूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपजिल्हाधिकारी दिनेश गीते , जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तडस , जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे , अन्न व औषधी प्रशासनाचे घिरके यांची व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असताना ही चिखली तालुक्यात एकही समर्पित कोविड रुग्णालय नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांना फार हालअपेष्टा सोसाव्या लागत आहे. आमदार श्वेता महाले यांनी मागील वर्षी पासून चिखली येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर सर्व सुविधांनी युक्त समर्पित कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केलेली आहे . जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा भार बुलडाणा खामगाव येथील कोविड रुग्णालयावर पडल्याने अनेक रुग्णांना वेळवर बेड मिळत नाही. ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकदा मागणी करूनही चिखली येथे समर्पित कोविड रुग्णालय सुरू करण्यास प्रशासनाला यश आले नाही . सोबतच चिखली येथे असलेले अलगीकरण कक्ष अपुरा व गैरसोयीचा होत असल्याने नव्याने एक अलगीकरण कक्ष सुरू करून चिखली उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्रणा नसल्याने नागरिकांना खाजगी सीटी स्कॅन साठी हजारो रुपये मोजावे लागत आहे . एकच खाजगी सीटी स्कॅन मशीन असल्याने तातडीने निदान होत नाही. त्यामुळे उशिरा उपचार होत असल्याने कोविडचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चिखली येथे सुद्धा सीटी स्कॅन यंत्रणा उभारली पाहिजे अशी सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केली.