अल्पवयीन मुलीचे लग्न रोखण्यात यश
By admin | Published: May 22, 2017 12:34 AM2017-05-22T00:34:47+5:302017-05-22T00:34:47+5:30
सिंदखेडराजा : वर्दडी तांडा येथील अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावण्याचा डाव किनगावराजा पोलिसांनी प्रसंगावधान राखत उधळून लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : तालुक्यातील वर्दडी तांडा येथील अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावण्याचा डाव किनगावराजा पोलिसांनी प्रसंगावधान राखत उधळून लावला असून, बालविवाह हा कायद्यानुसार गुन्हा असल्याची समज त्या डॉक्टर वराला देण्यात आली.
वर्दडी तांडा येथील सर्जेराव तोताराम चव्हाण (काल्पनीक नाव) यांच्या मुलीसोबत जालना जिल्ह्यातील पाथु्रड येथील डॉ.रामेश्वर विठ्ठल राठोड (वय २६ ) या युवकासोबत २३ मे रोजी लग्न ठरले होते. मुलगी ही अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांना मिळाली. त्यांनी या बाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पी.एस.एंडोले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी शाहनवाज खान यांना चौकशीचा आदेश दिला. १७ मे रोजी सदर प्रकरणाची चौकशी केली असता शाळेच्या दाखल्यावरुन मुलीचे वय १६ वर्षे ३ महिनेच असल्याचे निदर्शनास आले.मुलगी ही अल्पवयीन असून, तिचा बालविवाह करता येणार नाही. बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्याची समज पोलिसांनी मुलीचे वडील, मुलाचे वडील आणि वर डॉ. रामेश्वर विठ्ठल यांना दिली. त्यानंतर प्रतिष्ठित पंचासमक्ष तालुका दंडाधिकारी यांचे समक्ष प्रतिज्ञालेख शपथेवर सदरचा बालविवाह करणार नसल्याचे पोलीस स्टेशनला लेखी दिले. ही कार्यवाही ठाणेदार सेवानंद वानखेडे, पोहेकॉ शेषराव सरकटे, पोकॉ विष्णू सानप, महिला पोकॉ आदिती हुशारे यांनी केली. नवरदेव डॉ.रामेश्वर राठोड यांच्यावर पोस्टे मुकुंदवाडी औरंगाबाद येथे कलम ३७६, ५०६, भादंविनुसार गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी दिली.