समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, असा होता घटनाक्रम
By निलेश जोशी | Published: July 1, 2023 12:32 PM2023-07-01T12:32:54+5:302023-07-01T12:33:31+5:30
चालकाच्या म्हणण्यानुसार बसचा टायर फुटल्याने बस एका पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाली.
सिंदखेड राजा: विदर्भ ट्रॅव्हल ची बस (क्रमांक एम एच २९ बीई १८१९) सायंकाळी ६ वाजता नागपूर येथून निघाली यवतमाळ,वर्धा मार्गे ही बस रात्री १२ वाजेच्यां सुमारास कारंजा लाड येथे जेवणासाठी थांबली होती.जेवण आटोपून या बस ने पुढील प्रवास सुरू केला. या दरम्यान वर्धा,कारंजा येथून काही प्रवासी बस मध्ये बसल्याचे चालकाने सांगितले. शनिवारी भल्या पहाटे १:२० वाजता बस चालकाच्या म्हणण्यानुसार बसचा टायर फुटल्याने बस एका पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाली.
यातच बसची डिझेल टँक फुटल्याने गाडीने पेट घेतला. जवळच असलेल्या पिंपळ खूटा येथील प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती सिंदखेडराजा पोलिसांना दिली, १:४५ वाजता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. २ वाजता सिंदखेडराजा येथील सामाजिक कार्यकर्ते यासिन शेख, संदीप मेहेत्रे, बूधू चौधरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत कार्य सुरू केले. यात पिंपळ खुटा येथील काही नागरिक देखील मदतीला धावले. २:१५ ते २:३० वाजे दरम्यान, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर येथील नगर परिषद व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अग्निशमन वाहने घटना स्थळी पोहोचली. ४ वाजेपर्यंत बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर ६:३० वाजेपर्यंत जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
७ वाजता रुग्णवाहिकेद्वारे जळालेले मृत देह बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी पहाटे ३:३० वाजता घटनास्थळी पोहोचले
सकाळी ५:२० वाजता पोलीस अधीक्षक सुनील कडासने घटनास्थळी पोहोचले.
५:४० वाजता जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड घटनास्थळी
७:३०वाजता आयजी जयंत नाईकनवरे
८:३०वाजता विभागीय आयुक्त निधी पांडे
९ वाजता खासदार प्रताप जाधव
१०:३० वाजता मंत्री गिरीश महाजन