अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Published: March 13, 2015 01:47 AM2015-03-13T01:47:52+5:302015-03-13T01:47:52+5:30

सहा महिन्यांत पिकांचे नुकसान : आठ हजार मि.मी. पावसाची नोंद

Suddenly the rain rained | अवकाळी पावसाने झोडपले

अवकाळी पावसाने झोडपले

Next

बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. २0१४ च्या जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत झालेल्या अतवृष्टीच्या फटक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाळा सरल्यानंतरही उन्हाळ्याच्या मार्चपर्यत प्रत्येक महिन्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा जिल्ह्यासाठी दहा महिन्यांचा ठरला आहे. या दरम्यान ८ हजार १७९.९२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यावर्षी पावसाळ्यानंतरच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७४ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रातील सोयबीन, कापूस, ज्वारी, कांदा, मका, तूर, मूग आदी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले.
दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगल्या पावसाने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र सप्टेंबर २0१४ च्या शेवटपर्यत सरसरीपेक्षा जास्त पाऊस आल्याने नदी-नाल्यांना पूर आला. जून तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मोठे नुकसान झाले. पावसाने शेवटच्या टप्प्यात सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १६ हजार शेतकर्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला. बर्‍याच ठिकाणी उभी पिके झोपली, तर काही ठिकाणी संपूर्ण शेती खरडून निघाली.
वर्ष संपताना नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांचे रब्बी पीकही हातातून गेले. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांना मोठा फटका बसला. ३१ डिसेंबर २0१४ आणि १ व २ जानेवारी २0१५ या तीन दिवसांत अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यात १५ हजार ४४३ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे नोंदविण्यात आली. यात रब्बी पिकातील हरभरा, तूर, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच बागायती क्षेत्राचे नुकसान झाले.
पावसाची ही अनियमितता यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यातही कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात ११ व २८ तारखेला तसेच १ आणि ११ मार्च या चार दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४0 टक्के पिकांचे व बागायती पिकांच्या बहराचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागात नोंदविण्यात आली. या चार दिवसांच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यातील आंबा, गहू, कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले, तर खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यांमध्ये सोंगणीला आलेला गहू, हरभरा तसेच सोंगून ठेवलेले पिकांचे तसेच काही प्रमाणात कृषिमालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Web Title: Suddenly the rain rained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.