ऐन सणासुदीत साखर महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:11+5:302021-08-13T04:39:11+5:30
२०२१ या वर्षात वाहनांतील इंधनाचे आणि खाद्यतेलाचे दर चांगलेच कडाडले आहेत. याच दोन वस्तूंच्या खरेदीमुळे सर्वसामान्यांना कसरत करावी लागत ...
२०२१ या वर्षात वाहनांतील इंधनाचे आणि खाद्यतेलाचे दर चांगलेच कडाडले आहेत. याच दोन वस्तूंच्या खरेदीमुळे सर्वसामान्यांना कसरत करावी लागत असतानाच आता घरात अत्यावश्यक असणाऱ्या साखरेचे भावही हळूहळू वाढत आहेत. ऐन श्रावणात साखरेचे दर वाढत असल्याने नोकरदारांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांचेही बजेट कोलमडले आहे. हे दर आणखी वाढणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून, काही दिवस याच भावाने साखर खरेदी करावी लागणार आहे. तेव्हा किराणा भरताना खाद्य तेलासोबतच गोड असणाऱ्या साखरेने सर्वसामान्यांचे तोंड कडू केले आहेत असे म्हणणे गैर ठरणार नाही.
का वाढले भाव?
उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात चहा पिण्याचे प्रमाण अधिक वाढते. परिणामी साखर अधिक खरेदी केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांत गाळप कमी होत असल्याने आहे त्या साठ्यातील साखर बाजारात आणली जाते. तर याच दिवसांत सणसमारंभ अधिक असल्याने प्रत्येक सणाला काहींना काही गोडधोड करावेच लागते. यासोबतच आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीचाही परिणाम सध्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखरेचे भाव वाढले असल्याची माहिती समोर येत आहे.
साखरेचे दर प्रति क्विंटल
महिना दर
जानेवारी ३३२०
फेब्रुवारी ३३००
मार्च ३३३०
एप्रिल ३३४०
मे ३३७०
जून ३३५०
जुलै ३४००
ऑगस्ट ३५००
महिन्याचे बजेट वाढले
आधीच खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे दर वाढलेले असताना आता यात भरीस भर साखरेचेही दर वाढल्याने महिन्याचे आर्थिक गणित विस्कटले आहे. आता आणखी पुढील किती दिवस पुन्हा हे दर वाढलेले राहतील हे सांगता येत नसल्याने किराणा भरताना काटकसर करावी लागणार आहे.
-किरण टाकळकर, बुलडाणा.
साखर कितीही महागली तरी घरातील वयोवृद्धांना चहा तर लागतोच. आता पुढील काही दिवसांत येणाऱ्या सणसमारंभांमध्ये गोडधोड पदार्थ तर करावेच लागणार आहेत. साखरेचे दर वाढले तर ते एवढे नसून, इतर वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ते आधी कमी होणे गरजेचे आहे.
-रुक्मिणी झाल्टे, बुलडाणा.