पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:37+5:302021-06-03T04:24:37+5:30

बुलडाणा : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले आहे. त्याऐवजी आता साखर दिली जात ...

Sugar instead of oil in supplemental nutrition | पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

googlenewsNext

बुलडाणा : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले आहे. त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. तेलाच्या वाढत्या भावामुळे शासनाकडून ही काटकसर करण्यात येत असली, तरी या निर्णयाबाबत जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावीत व कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोविडमध्ये यामध्ये काही अडथळे येत असले तरीदेखील अंगणवाडी सेविका व मदतनीसांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत विविध खाद्यान्न पोहोचविले जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पूरक पोषक आहारातून खाद्यतेल गायब झाले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. तेलाच्या भावात मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलो दीडशेपेक्षा जास्त भाव आहे. याउलट साखरेचे भाव स्थिर असून, साखर ३६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळत आहे. यामुळे शासनाच्यावतीने पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखरेचे वाटप करून खर्चात कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

फोडणी द्यायची कशी?

कोविड काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे शासनाने तेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे. तेलासह साखर दिल्यास कोविड काळात गरीब, गरजूंना त्याचा लाभ होईल.

- मनीषा ठाकरे.

शासनाने तेलाऐवजी साखर देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. महागाई वाढत चाललेली असताना सरकारची ही काटकसर कशासाठी सुरू आहे.

- शोभा खंडारे.

शासनाची पोषक आहार योजना ही खरोखरच कौतुकास्पद आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरळीत होत आहे. मात्र या योजनेतील दिले जाणारे घटक वाढविण्याऐवजी कमी करणे ही सरकारची लाभार्थ्यांप्रतीची भूमिका योग्य नाही.

- प्राची अढाव

काय काय मिळते?

६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गहू २८०० ग्रॅम, चवळी १५०० ग्रॅम, मसूर १५०० ग्रॅम याव्यतिरिक्त इतर गटातील लाभार्थ्यांना चणा, हळद, मीठ, मिरची पावडर आदींचे वितरण केले जाते.

पूरक आहार योजना

एकूण लाभार्थी : ९६६५८

सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी : ७७,४७५

गरोदर व स्तनदा महिला लाभार्थी : २९,२१३

शासनाच्या धाेरणानुसार पाेषण आहाराचे वितरण करण्यात येते़. प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळेल याकरिता आमचा प्रयत्न असतो. याकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीस हे काम पाहतात. कोविड काळात आम्ही लाभार्थ्याला घरपोच सुविधा कशी देता येईल, याकडे लक्ष देत असतो. पोषक आहार योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

- अरविंद रामरामे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास जि. ़ प़., बुलडाणा

Web Title: Sugar instead of oil in supplemental nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.