आर्थिक विवंचनेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By संदीप वानखेडे | Published: June 2, 2024 05:49 PM2024-06-02T17:49:01+5:302024-06-02T17:50:41+5:30
विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर अंढेरा पोलिसांना हीबाब कळविण्यात आली. दरम्यान, ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देढे व वायाळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
चिखली : आर्थिक विवंचतेनून ६५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गावाजळील एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिखली तालुक्यातील मेरा बु. येथे २ जून राेजी घडली. शंकर झुंगाजी डोंगरदिवे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मेरा बु. येथील मृतक शेतकरी शंकर झुंगाजी डोंगरदिवे याच्याकडे गावालगत भाग २ मध्ये एकूण अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. याच शेतात मुलाबाळांसह ते वास्तव्यास राहून शेती करत होते. त्यांनी शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून ५५ हजार, तसेच ग्रामीण कुटा बँक असे सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचा कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. सतत दोन वर्षे शेती तोट्यात गेलेली, त्यात आता पेरण्याजवळ आल्या परंतु जुने कर्ज फिटलेले नसल्याने बँकांसह व खासगी सावकारही कर्ज द्यायला तयार नाहीत. यामुळे ते विवंचनेत होते. याच विवंचनेतून त्यांनी रविवारी सकाळी शेतातील एका झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर अंढेरा पोलिसांना हीबाब कळविण्यात आली. दरम्यान, ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देढे व वायाळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. मृतक शेतकरी शंकर डोंगरदिवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तसेच सहा बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे.