बुलडाण्याच्या शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 11:10 AM2020-12-05T11:10:18+5:302020-12-05T12:13:51+5:30
Buldhana News दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
बुलडाणा: येथील बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान ही संपूर्ण घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे. नेमक्या कोणत्या कारणांनी या दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केली ही बाब स्पष्ट झालेली नाही.
शेगाव येथील एका चोरीच्या प्रकरणात हे दोन्ही विधी संघर्ष बालक बुलडाणा शहरातील शासकीय मुलांचे निरीक्षण/बालगृहामध्ये होते. पाच डिसेंबर रोजी सकाळी त्यांनी बेडशीट व टॉवेलच्या सहाय्याने आत्महत्या केली. सकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जाते. दोन्ही विधी संघर्ष बालक हे सेगाव येथील चोरीच्या प्रकरणात बुलडाणा बालसुधारगृहात १५ दिवसापूर्वीच आले होते. यातील एका मुलाची आई ही एनडीपीएसच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याचे वडील गतीमंद असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, एसडीपीअेा रमेश बरकते, बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंके यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यासोबतच बाल न्यायमंडळाचे न्यायाधिश यांच्यासह बाल कल्याण समिती सदस्य, जिल्हा सत्र न्यायाधिश यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सध्या पोलिस घटनास्थळी पंचनामा करत असून मृत मुलांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या दोघांपैकी एकाने यापूर्वी बालसुधारगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही येथील बालसुधारगृहात काही दिवस तो होता, असे सुत्रांनी सांगितले.