सुशिक्षित बेराेजगार विद्यार्थांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:52+5:302021-02-09T04:37:52+5:30
कंडारी येथील संदीप नारायण जायभाये (२२) हा ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चप्पल आणायची आहे, असे म्हणून ...
कंडारी येथील संदीप नारायण जायभाये (२२) हा ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चप्पल आणायची आहे, असे म्हणून आईकडून पैसे घेऊन घराबाहेर पडला. मात्र, दिवसभर तो घरी परतला नाही. म्हणून कुटुंबीय व ग्रामस्थांनी ६ फेब्रुवारीला दिवसभर त्याचा शोध घेतला. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास संदीप जायभाये हा गावाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी बेलाच्या झाडाला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाची सूचना पोलीस पाटील प्रकाश सानप व मृतकाचा भाऊ गैबीनाथ नारायण जायभाये यांनी साखरखेर्डा पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे, पीएसआय दीपक राणे, प्रकाश मुंढे, सूरजसिंग इंगळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शव विच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे रवाना केले. ७ फेब्रुवारी दुपारी कंडारी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृतक संदीप जायभाये याच्यापश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. १२ पास असलेल्या संदीप जायभाये हा पोलीस किंवा सैनिक भरतीसाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याला भरती अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. मात्र, त्याने अचानक आत्महत्या केल्याने, त्याच्या नातेवाईक व मित्र वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.