सुजलाम् सुफलाम्’चे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम- शांतीलाल मुथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 01:36 PM2020-02-29T13:36:34+5:302020-02-29T13:36:52+5:30
दोन वर्षात प्रकल्पातंर्गत झालेले काम व पुढील काळात करावयाच्या कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोणातून बैठक घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत जवळपास एक हजार २५५ ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली असून त्यातंर्गत निघालेल्या गाळामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक बनण्यास मदत झाली असून या प्रकल्पाचे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे मत बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात २६ फेब्रुवारी रोजी गेल्या दोन वर्षात प्रकल्पातंर्गत झालेले काम व पुढील काळात करावयाच्या कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोणातून बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केली. या बैठकीस जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, शांतीलाल मुथ्था, बीजेएसचे जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी राजाराम पुरी, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.
सुमन चंद्रा रुजू झाल्यानंतरची ही पहिलीच सुजलाम सुफलामची बैठक होती. त्यानुषंगाने राजेश देशलहरा यांनी त्यांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा प्रशासन आणि बीजेएसच्या वतीने मार्च २०१८ पासून जेसीबी, पोकलेन असा १६८ मशीनन्सच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे १३ ही तालुक्यात करण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या अशा व्यापक कामामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होऊन जमिनीची सुपीकता वाढली आणि शेतकरी सुखावल्याचे चित्र असल्याचे मत शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले. यामुळे गारमीण भागातील अर्थकारणालाही चालना मिळाली असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.
जिल्हाधिकारी सुमन चंद्राही यांनी उपक्रमाचा सविस्तर आढावा घेऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले. सोबतच शासनाच्या निर्देशानुसार लवकरच आगामी काळातील कामाची दिशा ठरविण्यात येईल, असे स्पष्ट केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.