'सुजलाम सुफलाम प्रकल्प' : बुलडाणा जिल्ह्यात २ लाख घनफूट गाळ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:55 PM2018-03-14T13:55:03+5:302018-03-14T13:58:51+5:30
बुलडाणा : जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सुजलाफ सुफलाम योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर २ लाखांपेक्षा अधिक घनफूट गाळ काढण्यात आला आहे.
बुलडाणा : जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सुजलाफ सुफलाम योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर २ लाखांपेक्षा अधिक घनफूट गाळ काढण्यात आला आहे. शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली असून शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यात ६ मार्चपासून सुरु झालेला सुजलाम सुफलाम बुलडाणा प्रकल्प आता लोकप्रिय होत आहे. सर्व १३ तालुक्यात विविध धरणातील गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारा मोफत गाळ नेण्यासाठी जिल्हाभरातून शेकडो शेतकरी येत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी जेसीबी मशीन्स व गाळ वाहून नेणाºया ट्राली असे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. १३४ मशीन्सच्या सहाय्याने लवकरच प्रतिदिन १ लाख घनफूट गाळ काढण्याचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. या माशिन्सला आवश्यक ते डिझेल देण्याची व्यवस्थादेखील जिल्ह्यातील पेट्रोलपंप मालकांनी करून दिल्याने हे काम आता सुरळीत सुरु राहील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला. उप विभागीय अधिकारी तथा तहसीलदार सुरेश बगळे यांच्या समवेत मोहोज येथे सुरु असलेल्या कामाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. शेतकरी व अधिकाºयांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय जैन संघटनेच्या वतीने नियोजनबद्ध काम सुरु असल्याची माहिती मुख्य जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी दिली.