सुलतानपूर : जलयुक्त शिवारची कामे लोकप्रतिनिधींनी पाडली बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:31 AM2018-01-17T01:31:53+5:302018-01-17T01:32:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.
जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कोणतेही स्थळ सर्वेक्षण न करता अंदाजपत्रक बनवून चार साठवण बंधार्यांची कामे सुलतानपूर येथे सुरू होती; मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड होती. कामांमध्ये कमी सिमेंटचा वापर करून कमी गेजच्या लोखंडाचा वापर करण्यात येत असल्याचा आक्षेप आहे. खोदकामामध्ये मुरुमाचा वापर न करता मातीवरच बेड काँक्रीट अंथरल्या गेले आहे. हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लक्षात येताच त्यांनी कामाचे अंदाजपत्रक मागून ही कामे गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या जात होते.
परिणामी, जि.प.सदस्य पती दिलीप वाघ, लोणार पंचायत समितीचे गटनेते तथा पं.स.सदस्य डॉ. हेमराज लाहोटी, माजी सरपंच विजय खोलगडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष रिंढे, रामेश्वर मंत्री यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन हे काम बंद पाडले. जोपर्र्यंत दर्जेदार कामाची हमी मिळणार नाही, तो पर्यंत हे काम होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. १५ जानेवारीला हे काम बंद पाडण्यात आले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सिंचन विभागातील अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, शिवणी पिसा परिसरातही जलयुक्तची कामे सुरू असून, तेथेही कामाची योग्य पद्धतीने गुणवत्ता राखल्या जात नसल्याची ओरड आहे. यासंदर्भात आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सध्या लक्ष लागून आहे.
अभियंता ‘नॉट रिचेबल’
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांचा भ्रमनध्वनी ‘नॉट रिचेबल’ होता. त्यामुळे त्यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
शिवार फेरींतर्गत सुलतानपूरची निवड
शासनाच्या शिवार फेरी दरम्यान सुलतानपूर गावाची जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झाली होती. वेगवेगळ्य़ा विभागाकडे येथील कामे सोपविण्यात आली आहेत; परंतु प्रारंभी कोणत्याच विभागाने कृती, अंदाज पत्रके बनवलीच नसल्याची माहिती समोर येत आहे. आधीच येथील टंचाईचा प्रश्न मोठा आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.