हजारो हेक्टरवरील उन्हाळी भुईमूग धोक्यात!
By admin | Published: May 14, 2017 02:28 AM2017-05-14T02:28:04+5:302017-05-14T02:28:04+5:30
पाण्याची कमतरता: भुईमूग जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड
बुलडाणा: जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी ९६0 हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे; मात्र भुईमुगाला पाणी अपुरे पडत असल्यामुळे हजारो हेक्टरवरील भुईमुगाने माना टाकल्या आहेत.
उन्हाळी पिकांमध्ये मका, सूर्यफूल, तीळ यापेक्षाही भुईमूग हे पीक सर्वात महत्त्वाचे समजल्या जाते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये भुईमुगाची पेरणी केल्या जाते. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकर्यांकडून उन्हाळी भुईमूग या पिकाला पसंती आहे. जिल्ह्यात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग पिकाचे ९६0 हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते; मात्र यामध्ये ३८६.८ टक्क्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. उन्हाळी भुईमुगाचे जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र १३0 हेक्टर असून, २८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात २४0 हेक्टर क्षेत्र असून, ३४0 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील नियोजित क्षेत्र २0 हेक्टर असून, १४६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात ३0 हेक्टर क्षेत्र नियोजित व २७ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४0 हेक्टर नियोजन व १९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात १४0 हेक्टर सरासरी क्षेत्र असून, ६८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात नियोजन नसतानाही ८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. लोणार तालुक्यात १२0 हेक्टर क्षेत्र असताना १८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यात १४0 हेक्टर सरासरी क्षेत्र असून, १ हजार ६३0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. शेगाव तालुक्यात २0 हेक्टर नियोजन असून, कुठेच पेरणी करण्यात आली नाही. मलकापूर तालुक्यात ४0 हेक्टर क्षेत्रापैकी ३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मोताळा तालुक्यात ४0 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतानाही ३५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी भुईमूग पिकाचे क्षेत्र वाढलेले असताना या पिकाला मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भुईमूग पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी जलस्रोतांना पाणी येईल, त्या वेळेला भुईमुगाला पाणी देऊन भुईमूग जगविण्याची धडपड करत आहेत.