लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
By निलेश जोशी | Published: May 16, 2024 10:31 PM2024-05-16T22:31:12+5:302024-05-16T22:32:04+5:30
मानवी संस्कृतीच्या आस्था आणि श्रद्धास्थानामध्ये लोणारचे एक वेगळे महत्त्व आहे
- मयूर गोलेच्छा/ रहेमान नवरंगाबादी
लोणार: वैज्ञानिक महत्त्वासोबत अध्यात्मिक महत्त्व असलेल्या लोणार येथील वास्तूकलेचा अदभूत नमूना असलेल्या दैत्यसुदन मंदिरात विष्णूच्या मूर्तीच्या ललाटी अर्थात दैत्यसुदनाच्या मस्तकी १४ ते १९ मे दरम्यान सुर्यकिरणांचा अभिषेक होत आहे. यंदा रामनवमीला अयोध्येत रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या मुर्तीला सुर्यकिरणांचा अभिषेक झाला. त्याच प्रमाणे लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामधील विष्णूच्या मुर्तीलाही मे महिन्यात पाच दिवस हा सूर्यकिरणांचा अभिषेक दरवर्षी होत असतो.
मानवी संस्कृतीच्या आस्था आणि श्रद्धास्थानामध्ये लोणारचे एक वेगळे महत्त्व आहे. उल्कापातामुळे लोणार सरोवर निर्मिती झाली. त्याच प्रमाणे येथे मानवी संस्कृतीही विकसीत होत गेली. त्यामुळेच येथील या मंदिरातील सूर्यकिरणांच्या उत्सवाचे एक महत्त्व आहे. प्राचीन पण तितकीच सुंदर कलात्कमतेचा नमुना असलेल दैत्यसुदन मंदिर आहे. १८७८ मध्ये प्रत्यक्षात हे मंदीर दुसऱ्यांदा जगासमोर आले. प्रारंभी ते मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले होते. त्यानंतर त्याची कलात्मकता, धार्मिक, पौराणिक संदर्भ स्पष्ट करणारी या मंदिराच्या भिंतीवरील शिल्प यामुळे या मंदिराचे एक महत्त्व आहे. मूळ बांधकामाची हेमाडपंती शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे. बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यासारखं दिसतं. मंदिराचं आवार प्रशस्त आणि फरसबंदी आहे. संपूर्ण मंदिराच्या बाह्य बाजूने एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे सलग नक्षीदार खांब कोरून काढले आहेत.
या मंदिरामध्ये मे महिन्यात दैत्यसुदन अर्थात विष्णूच्या मुर्तीवर सूर्यकिरणांचा होणारा अभिषेक एक अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालणारी घटना आहे. दरवर्षी या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातल्या गेल्याने हा किरणोत्सव पाच दिवस साजरा होतो. पाच दिवस तो १० मिनीट बघता येतो. त्यामुळे या मंदिरात या काळात गर्दी होते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती या किरणोत्सवाच्या अभिषेखात आपल्याला खिळवून ठेवते. हे मंदिर उत्तर चालुक्य राजाविजयादित्य अर्थात विक्रमादित्य सहावा याने त्रिभुवनकिर्ती नावाच्या शिल्पीच्या मार्गदर्शना नुसार ११ व्या शतकात नवरात्रतांत्रिक पद्धतीने बांधले गेलेले आहे, असे सांगण्यात येते.
झिरो सावली दिनाच्या दिवशी सूर्य माथ्यावर असताना सकाळी ११ .१० वाजेपासुन ११.३० वाजता दरम्यान सूर्याची किरणे थेट मंदिरातील विष्णुच्या मुर्तीवर पडतात. हा किरणोत्सव आणखी दोन दिवस पर्यटकांना पहाता येईल.
शैलेश सरदार, गाईड, लोणार सरोवर