महिलांना सॅनेटरी नॅपकीन यंत्राचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:26 PM2019-09-22T14:26:22+5:302019-09-22T14:26:35+5:30
आरोग्य उपकेंद्रामध्ये सुरू केलेल्या या सुविधेमुळे विद्यार्थिनींसह महिलांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सॅनेटरी नॅपकीन खरेदीसाठी महिलांना आजही संकोच वाटतो, त्यामुळे तालुक्यातील साखळी बु. ग्रामपंचायतने गावातच सॅनेटरी नॅपकिनचे स्वयंचलीत यंत्र बसविले आहे. आरोग्य उपकेंद्रामध्ये सुरू केलेल्या या सुविधेमुळे विद्यार्थिनींसह महिलांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
महिला व मुलींचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी तालुक्यातील साखळी बु. या गावातील ग्रामपंचायतीने स्वयंचलीत सॅनेटरी पॅड वेंडिंग मशिन खरेदी केले. हे मशिन ग्रामपंचायत किंवा शाळा याठिकाणी ठेवल्यास त्याचा वापर करतांना महिला समोर येणार नाहीत. त्यामुळे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये हे स्वयंचलीत यंत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे महिला व विद्यार्थीनींना आरोग्याच्या दृष्टीने सॅनेटरी नॅपकिनच्या स्वयंचलीत यंत्राचा मोठा फायदा होणार आहे.
सॅनेटरी नॅपकीन विषयही आजही पाहिजे त्या प्रमाणात जागृती झालेली नसल्याने महिला सॅनेटरी नॅपकीनच्या खरेदीसाठी संकोच बाळगतात. परंतू आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साखळी बु. ग्रामपंचायतने आरोग्य उपकेंद्रामध्ये सॅनेटरी नॅपकीन यंत्राची सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा प्रत्येक गावात होणे आवश्यक आहे.
- विजया कोळसे, सरपंच, साखळी बु.
महिलांनी केले पूजन
साखळी बु. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये सॅनेटरी नॅपकिनचे स्वयंचलीत यंत्र बसविल्यानंतर सरपंच विजया अनिल कोळसे यांच्यासह महिलांनी यंत्राचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचात सदस्या द्वारकाताई खंडारे, मंगला सोनुने, कासाबाई लहासे, ज्योती चाटे, शमनुरबी ईस्माईल खान, सुमन सोरोशे, ललिता सोनुने, संगीता सोनुने, आशा वर्कर्स योगिता डांगे, नलिनी गोरे, रेखा सायसुंदर, चंदाबाई सोनुने, दुर्गाबाई सुरडकर, अंगणवाडी सेविका मनोरमा साखळीकर, वरदाळे व विद्यार्थीनींची उपस्थिती होती.