आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांना आधार देणार
By admin | Published: January 8, 2015 01:08 AM2015-01-08T01:08:07+5:302015-01-08T01:08:07+5:30
राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षवर्षाताई देशपांडे यांचा निर्धार.
बुलडाणा :शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा गेल्या दशकापासून अतिशय गंभीर झाला आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने शासनाने कर्जमाफीपासून तर पॅकेजपर्यंत अनेक योजनांचा रतिब घातला; मात्र आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. हा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र या प्रश्नामध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवण्यात आला. ज्या शेतकर्याने आत्महत्या केली त्या घरातील विधवा आजही मोठय़ा हिमतीने कुटुंब सांभाळत आहेत. कुटुंबप्रमुख गेल्यावर त्या घराची स्थिती आणखीच खालावली आहे. अशा स्थितीत या विधवा महिलांच्या समस्यांकडे कुणाचेही लक्ष नाही, त्यामुळे येणार्या काळात अशा महिलांसाठी लढा उभारून काम करण्याचा निर्धार राज्य महिला लोक आयोगाच्यावतीने करण्यात आला आहे, अशी माहिती वर्षाताई देशपांडे यांनी दिली. राज्य महिला लोक आयोगाच्यावतीने बुलडाण्यात बुधवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या पृष्ठभूमीवर आयोगाच्या कार्याध्यक्ष वर्षा देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, येणार्या काळात राज्य महिला लोक आयोगाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना तातडीने कुठल्या आधाराची गरज आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. सर्वात आधी अशा महिलांसाठी हेल्पलाईन व कायदेविषयक सल्ला सुरू करीत असून, त्या माध्यमातून पॅकेज किंवा कर्जमाफीचा लाभ अशा कुटुंबांना झाला का? याचाही शोध घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी महिला लोक आयोगाच्या समन्वयक जिजा चांदेकर व जिल्हाध्यक्ष अँड.सोनाली सावजी देशपांडे उपस्थित होत्या.