सुरेखा मॅडमचे शैक्षणिक उपक्रमही ठरताहेत ‘सुरेख’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:30+5:302021-01-03T04:34:30+5:30
बुलडाणा : अठराव्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आज अनेक महिला ...
बुलडाणा : अठराव्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आज अनेक महिला शिक्षिका ज्ञानदानाचे कार्य करत आहे. त्यातील एका आदर्श महिला शिक्षिकेच्या प्रवासावर प्रकाश टाकला असता, त्यांचे शैक्षणिक उपक्रमही आपल्या नावाप्रमाणेच ‘सुरेख’ असल्याचे दिसून आले. चित्रकला, कार्यानुभव या विषयातून मुलांना अभ्यासाची गोडी लावणाऱ्या आदर्श महिला शिक्षिका आहेत, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जिल्हा परिषद शाळेतील सुरेखा रामचंद्र जावळे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी महिला शिक्षक दिन साजरा करण्यात येत आहे. महिला शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जानेफळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका सुरेखा रामचंद्र जावळे यांच्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला असता अनेक आदर्श उपक्रम समोर आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, गोरगरीब मुलांना साहाय्य करणे त्यांना अभ्यासासाठी प्रेरणा देणे असे सामाजिक कार्यच नव्हे तर, मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोगही शाळेत राबविले आहेत. शैक्षणिक साहित्यनिर्मितीवरही त्यांचा भर आहे. त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची जिल्हास्तरावर दखल घेण्यात आलेली आहे. शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, विविध वस्तूनिर्मितीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे, बाहुली नाट्यातून हसून, खेळून मुलांमध्ये रमणे, विद्यार्थ्यांचा अभ्यासातील कंटाळा दूर करणे हे त्यांचे विशेष आहे. मुलींनी शिका व सक्षम व्हा, हा त्यांचा अट्टाहास कायम समोर आला आहे. जानेफळ येथे येण्यापूर्वी त्यांनी उटी येथील जिल्हा परिषद शाळेतही काम केले. दरम्यान, उटी शाळेला आयएसओ मानांकर प्राप्त झाले. चित्रकला आणि कार्यानुभव या विषयात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्या शाळेतील मुलांनाही या दोन्ही मनोरंजनात्मक विषयातून कलेची आवड निर्माण झाली आहे. चिंचोक्याचे कासव, पानापासून पक्ष्यांचे विविध आकार, ससा, कापडाचे पक्षी, पृष्ठकांच्या चिमण्या, अशा विविध वस्तू त्यांनी बनिवल्या आहेत.
डॉक्टर, इंजिनिअर घडले
शिक्षिका सुरेखा जावळे यांच्या जिल्हा परिषद शाळेतील २८ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांच्या हातून १५ डॉक्टर व १३ इंजिनिअर आतापर्यंत घडले आहेत. शिक्षक, पोलीस यासोबतच अनेक उत्कृष्ट शेतकरीही त्यांनी घडविले आहेत.
पुरस्कारांचा खजिना
शिक्षिका सुरेखा जावळे यांच्या आदर्श शैक्षणिक उपक्रमांसाठी पुरस्कारांचा खजिना निर्माण झाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीकडून पुरस्कार प्राप्त झाला. शिक्षक संघटनेकडून तालुकास्तरीय पुरस्कार, जिल्हास्तरीय स्वामी विवेकानंद पुरस्कार, राज्यस्तरीय युथ फेडरेशनचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.