आश्चर्यम...वाघोळ्यातील ते ४४ जण औषध न घेताच झाले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:44 AM2021-05-06T11:44:14+5:302021-05-06T11:44:25+5:30
Corona Virus News : २० दिवस पाॅझिटीव्ह रूग्णांचा अनेकांशी संपर्क आल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असून, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
- विश्वनाथ पूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरवेल : येथून जवळच असलेल्या वाघोळा येथील ४४ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल तब्बल २० दिवसांनी पॉझिटीव्ह मिळाला. आरोग्य विभागाने या सर्वांची ५ मे रोजी पुन्हा तपासणी केली असता ते सर्वच जण निगेटीव्ह आले. २० दिवस पाॅझिटीव्ह रूग्णांचा अनेकांशी संपर्क आल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असून, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र नरवेल अंतर्गत वाघोळा गावात १७ एप्रिल रोजी शिबीर घेऊन गावातील नागरिकांची कोरोना चाचणी केली. त्यानंतर त्यांचे अहवाल बुलडाणा येथे पाठविण्यात आले. हे अहवाल ४ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध झाले. त्यानंतर ५ मे रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी वाघोळा येथे आले व १७ एप्रिल रोजी तपासणी केलेल्या ४४ जणांना त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले. तसेच पॉझिटीव्ह रूग्णांसाठी औषध, गोळ्या आणल्या. यावेळी गावातील नागरिक चांगलेच संतत्प झाले. एवढ्या विलंबाने अहवाल आल्याने गावकºयांनी रोष व्यक्त केला. २० दिवसांत पॉझिटीव्ह असलेल्या नागरिकांनी अनेकांशी संपर्क केला. दुकानांमध्ये जाऊन खरेदीही केली. ५ मे रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्याकरिता औषध घेऊन गेल्यावर गावकºयांनी विरोध करीत पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली. त्यानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी ४४ पॉझिटिव्ह व्यक्तींची पुन्हा चाचणी केली असता ते सर्व जण निगेटीव्ह आले. वाघोळा गावात कोरोना बाधित रुग्णांची वाढलेली संख्या पाहता तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी ५ मे रोजी सायंकाळी थेट वाघोळा गाव गाठीत ग्रामस्तरीय समितीची तातडीची बैठक घेतली.
आरटीपीसीआर चाचणीला २० दिवस पूर्ण झाले असून अहवाल रखडले होते. आपण तपासणी केलेल्यांना लक्षणांबाबत विचारणा केली असता कोणतेही लक्षणे नव्हती. त्यानंतर ५ मे रोजी कोरोना चाचणी केली असता सर्वजण निगेटीव्ह आले.
- डॉ. मीनल तडके
वैद्यकीय अधिकारी, नरवेल