खामगावात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 03:06 PM2019-11-20T15:06:58+5:302019-11-20T15:07:08+5:30
फेरीवाल्यांच्या मोबाईल अॅप सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : फेरीवाल्यांच्या मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षणास खामगाव शहरातील फेरीवाल्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे मोबाईल अॅप सर्वेक्षण रखडल्याचे दिसून येते.
केंद्र शासनाच्या पथ विक्रेता(उपजिविका संरक्षण व पथविक्री विनिमन) अधिनियम-२०१४ मधील कलम ३६(१) अन्वये राज्य शासनाचे पद पथावरील पथविक्रेता उपजिविका संरक्षण व पथविक्री विनिमन महाराष्ट्र नियम २०१६ तसेच कलम ३८ (१) अन्वये पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनिमन) महाराष्ट्र योजना २०१७ मंजूर केली आहे.
या योजनेतंर्गत खामगाव नगर पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून या मोहिमेला फेरीवाल्यांकडून अतिशय अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे फेरीवाल्याचे मोबाईल सर्वेक्षण रखडल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अन्य पालिकांमध्येही अशीच स्थिती आहे. दुसरीकडे राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचीही पालिकांकडून अपेक्षीत अशी प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची ओरड होत आहे.
सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत !
खामगाव नगर पालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या मोबाईल अॅप सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीत मोबाईल सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच अधिक माहितीसाठी शहर अभियान व्यवस्थापक राजेश झनके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आहेत सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबी!
शहरातील परवानाधारक/ विना परवाना धारक फेरीवाला व्यावसायिकांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) आधार कार्डशी संलग्न (लिंक) करून घ्यावेत. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्सप्रत, रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, विधवा/एकल माता असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, अनुजाती/ जमाती प्रवर्गात समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र आदी दस्तवेज सादर करून मोबाईल सर्वेक्षण पूर्ण करावे.