बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:09 PM2021-06-13T12:09:29+5:302021-06-13T12:09:39+5:30

Survey of out-of-school children in Buldana district begins : मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

Survey of out-of-school children in Buldana district begins | बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रत्येक पालक हा मुलाच्या भविष्याबाबत चिंतेत असतो. त्याने दररोज शाळेत जावे, चांगला अभ्यास करावा, असे पालकाला वाटते. परंतु शाळेत जाऊन खरंच नोकऱ्या लागणार का? असा अनोखा प्रश्न एका पालकाने शाळा बाह्य मुलांच्या सर्वेक्षणादरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांकडेच उपस्थित केला. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 
जिल्ह्यात ११ जूनपासून शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु या मोहिमेदरम्यान पालकांकडून काय प्रश्न उपस्थित केले जातील, हे सांगता येत नाही. शाळाबाह्य मुलांच्या  सर्वेक्षण मोहिमेदरम्यान, देऊळगाव राजा येथील मुख्य मार्गावरून १२ वर्षांचा ओंकार नावाचा मुलगा आपल्या पालकांसह मेंढ्या घेऊन जात होता. 
दरम्यान, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी त्या मुलाची विचारपूस केली. तू शाळेत जातोस का? कोणत्या वर्गात आहेस? तुझी शाळा कोणती आहे? असे अनेक प्रश्न त्या मुलाला विचारले. त्यावर त्याच्या पालकाने शाळेत जाऊन नोकऱ्या लागणार का? तो नोकरीवाल्याइतके पैसे आताच कमावतो, असे उत्तर दिले. या सर्वेक्षणात शिक्षकांना अनेक नवनवीन अनुभव पाहावयास मिळतात.  ग्रामीण भागातील पालकांच्या प्रश्नांचे उत्तर देतांना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडतेय.

कोरोनामुळे लांबली मोहीम
शाळाबाह्य मुलांसाठी विशेष शोध मोहीम १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत राबविण्यात येणार होती. परंतु कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. 


शाळाबाह्य असलेल्या सर्वच मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. १०० टक्के विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी सर्व शिक्षण विभाग युद्धपातळीवर काम करीत आहे.                                  

  - सचिन जगताप,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा. 

Web Title: Survey of out-of-school children in Buldana district begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.