जालना -खामगाव रेल्वे मार्गाचा सर्वेक्षण अहवाल सकारात्मक राहण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:10 PM2021-01-07T12:10:11+5:302021-01-07T12:10:20+5:30
Jalna-Khamgaon railway line ट्रॅफिक सर्व्हे पॉझिटिव्ह असेल असा विश्वास आयआरटीएसचे उप-मुख्य परिचालन प्रबंधक (सर्वेक्षण) सुरेश जैन यांनी येथे व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: जालना -खामगाव रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी या भागातील जनतेमध्ये अत्यंत उत्साह आहे. ही जनभावना पाहता आमच्या माध्यमातून केला जाणारा ट्रॅफिक सर्व्हे पॉझिटिव्ह असेल असा विश्वास आयआरटीएसचे उप-मुख्य परिचालन प्रबंधक (सर्वेक्षण) सुरेश जैन यांनी येथे व्यक्त केला.
जालनाखामगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न गेली ११० वर्ष प्रलंबित आहे. रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून तसेच सर्व पक्षीय प्रयत्नातून यासाठी अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. त्याचेच फलित म्हणून रेल्वेने या मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ जानेवारीपासून ते सुरू झाले आहे. या पथकाने ६ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे भेट दिली. यावेळी तहसीलदार सुनील सावंत, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष नाझेर काजी, विविध क्षेत्रातील नागरिक, नगरसेवक उपस्थित होते.
प्रारंभी पथक प्रमुख एस. सी. जैन यांनी उपस्थिताना रेल्वे मार्ग का आवश्यक आहे, याबाबत मत प्रदर्शन करण्याची संधी दिली. त्यामुळे उपस्थितांपैकी बोलणाऱ्या प्रत्येकाने एक मुद्दा घेऊन रेल्वेमार्ग गरजेचा का? हे पटवून सांगितले. त्यानुषंगाने जैन यांनीही जनभावना पाहता त्यांचा अहवालही सकारात्मक राहील, असे संकेत दिले. पथकात जैन यांच्या समवेत ट्रॅफिक इन्स्पेक्टर रवी गुजराल, मुकेश लाल, सिनियर सेक्शन इंजिनियर दिनेश बोरसे, अजय खनके यांचा समावेश होता.
काजींनी दिला वासनिक अहवालाचा हवाला!
माजी नगराध्यक्ष नाझेर काजी यांनी पथकासमोर १९८२ मध्ये याच रेल्वे मार्गासंदर्भात वासनिक समितीने सरकारला दिलेल्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करून त्याची एक प्रत जैन यांना दिली. त्याच बरोबर मागील काळात रेल्वेला गरज वाटत नसलेला हा मार्ग आज किती गरजेचा आहे, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट केले.
समृद्धीची स्मार्ट सिटी महत्त्वाची!
मुंबई नागपूर या स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत माळ सावरगाव येथे होणाऱ्या स्मार्ट सिटीचा उल्लेख यावेळी झाला. स्मार्ट सिटीमुळे या भागात अनेक उद्योग व्यवसाय येणाऱ्या काळात उभारले जाणार आहेत. यात विशेष करून कृषीवर आधारित उद्योग, व्यवसाय असल्याने कृषी मालाची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार आहे. जालना येथील ड्राय पोर्ट याच रेल्वे मार्गाशी जोडला जाणार असल्याने जगभरात कृषी माल पाठवला जाऊ शकणार आहे.