खामगाव-जालनासोबतच शेगाव-जालना सर्वेक्षण करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:01+5:302021-01-08T05:53:01+5:30
खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे या अगोदरही सर्वेक्षण झाले होते. त्या सर्वेक्षणात हा रेल्वेमार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही असा निष्कर्ष काढल्याने या ...
खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे या अगोदरही सर्वेक्षण झाले होते. त्या सर्वेक्षणात हा रेल्वेमार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही असा निष्कर्ष काढल्याने या रेल्वे मार्गाचे काम होऊ शकले नाही. दरम्यान, नव्याने पाहणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खामगाव, जालना रेल्वेमार्गाचे खामगाव-जालना असेच सर्वेक्षण केल्यास आर्थिकदृष्ट्या ते फायद्याचे असणार नाही. त्यामुळे या प्रस्तावित मार्गाचे शेगाव जालना, असे सर्वेक्षण केल्यास आणि शेगाव-खामगाव असा मार्ग झाला, तर मुंबई, नागपूर आणि मुंबई, हैदराबाद हे दोन मोठे ब्रॉडगेज मार्ग जोडले जाऊन उत्तर, मध्य आणि दक्षिण भारत जोडण्यास मदत होईल. शेकडो किलोमीटर अंतर कमी होऊन प्रवासी आणि मालवाहतुकीला चालना मिळेल. शेगाव ते जालना, असे सर्वेक्षण करण्याची मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाची भेट घेऊन केली. या सर्वेक्षण पथकात सुरेश कुमार जैन उपमुख्य परिचालन प्रबंधक सर्वे, रविकुमार, मुकेश लाल मुख्य वाहतूक इन्स्पेक्टर, डी. ए. बोरसे, अजय खणके यांचा समावेश आहे.
केवळ १८ किमी अंतराने उत्पन्न शेकडो पटीने वाढेल
खामगाव, जालना १६५ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी हे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. खामगाव ते शेगाव या केवळ १८ किलोमीटर लांबीची वाढ केल्यास खामगाव, जालना ऐवजी शेगाव, खामगाव, जालना असे सर्वेक्षण झाल्यास आणि हाच रेल्वेमार्ग तयार झाल्यास केवळ १८ किलोमीटर वाढ केल्याने शेकडोपटीने रेल्वेचे उत्पन्न वाढणार आहे.