जखमी नागास शस्त्रक्रिया करून दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 18:56 IST2020-12-25T18:53:37+5:302020-12-25T18:56:59+5:30
Cobra get New life after Surgery टाकरखेड हेलगा येथे शेतात खोदकामा दरम्यान एक नाग जखमी झाला होता.

जखमी नागास शस्त्रक्रिया करून दिले जीवदान
बुलडाणा: शेतातील खोदकामादरम्यान जखमी झालेल्या नागावर (कोब्रा) पशुचिकित्सकांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जिवदान दिल्याची घटना २४ डिसेंबर रोजी चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथे घडली. बुलडाणा जिल्ह्यात जखमी सापावर अशी शस्त्रक्रिया करून त्यास जिवदान देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ही तिसरी घटना आहे. टाकरखेड हेलगा येथे शेतात खोदकामा दरम्यान एक नाग जखमी झाला होता. त्यावेळी तेथे नागाला कोणी हात लावला नाही. मात्र त्याची अवस्था पाहून उंद्री येथील सर्पमित्र श्याम तेल्हारकर आणि बुलडाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर या नागास सर्पमित्रांनी चिखली येथे आणले. तेथे व्हेटरनरी डॉक्टर युवराज यांनी सापाला भुल देवून बाहेर आलेले आतडे सुयोग्य पद्धतीने व्यवस्थित केले व जखमेच्या ठिकाणी तब्बल १२ टाके दिले. सध्या हा साप सुखरूप असून तो हालचालही करत असल्याचे सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. सध्या हा नाग उंद्री येथील सर्पमित्र श्याम तेल्हारकर यांच्याकडे ठेवण्यात आलेला आहे.