पोलिसांच्या झाडाझडतीने बस प्रवाशांना मनस्ताप
By सदानंद सिरसाट | Published: June 1, 2024 03:45 PM2024-06-01T15:45:51+5:302024-06-01T15:47:16+5:30
मोबाईल चोरीच्या घटनेत एसटीचा तब्बल पाऊण तास खोळंबा.....!
सदानंद सिरसाट, मलकापूर (बुलढाणा) : मोबाईल चोरीला गेल्याने एसटीत चढलेल्या तरुणीने आकांडतांडव केले. त्यामुळे धावती बस पोलिस ठाण्यात वळती करण्यात आली. त्याठिकाणी पोलिसांच्या झाडाझडतीने असंख्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याशिवाय तब्बल पाऊण तास एसटीचा खोळंबा झाल्याने एकच खळबळ उडाली.
राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच-०४, एस-८१९४ ही मलकापूर आगारातून खान्देशातील कुऱ्हा गावाकडे निघाली. शहरातील तहसील चौकात पहिल्या थांब्यावर शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नम्रता निनाजी शिंगोटे ही तरुणी चढली. रेल्वे पुलाखालून मुक्ताईनगर रस्त्यावर पुढे जात असतानाच त्या तरुणीने तिच्या जवळचा मोबाईल गायब झाल्याचा आरडाओरडा करत आकांडतांडव केले.
डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या थांब्यावर गाडी थांबवून वाहक दीपक भीमराव लोखंडे यांनी नम्रता शिंगोटे हिची विचारपूस केली. त्यांनी संबंधित नंबरवर फोन लावला, तो रिसीव्ह झाला नाही. मग त्यांनी तरुणीची समजून काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ती ऐकायलाही तयार नसल्याने वाहकाने एसटी पोलिस ठाण्यात वळविण्याचे चालकाला सांगितले.
पोलिस ठाण्यात एसटीतील ५० ते ५५ आबालवृद्ध प्रवाशांची डीबी पथकाने झाडाझडती घेतली, परंतु मोबाईल आढळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी दमदाटी देखील केली. तब्बल ३० मिनिटांच्या झाडाझडती नंतर एसटीच्या नोंदी घेण्यात आल्या. निर्धारित मार्गावर एसटी रवाना झाली. यात प्रवाशांना मात्र अनाठायी मनस्ताप सहन करावा लागला. त्यातल्या त्यात कुठल्याही प्रकारची चूक नसताना एसटीचा तब्बल पाऊण तास खोळंबा झाला.